State Excise Department : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्कच्या दोन महिन्यात 426 कारवाया

दोन कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपयांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या ( State Excise Department ) पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्कच्या पुणे विभागाकडून कारवाया केल्या जात आहेत. अवैध मद्य निर्मिती, मद्याची वाहतूक, विक्री तसेच परराज्यातील मद्याच्या वाहतुकीबद्दल विशेष मोहीम राबवून जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 426 गुन्हे दाखल करत 411 जणांना अटक केली आहे. या कारवायांमध्ये दोन कोटी 81 लाख 91 हजार 349 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या कारवायांमध्ये दोन महिन्यात उत्पादन शुल्क पुणे विभागाने 20 हजार 675 लिटर हातभट्टी दारू, 761 लिटर देशी दारू, 18 हजार 295 लिटर विदेशी दारू आणि 1823 लिटर ताडी पकडली आहे.

दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद असलेल्या आरोपींकडून चांगल्या वर्तणुकीचे बंधपत्र घेतले जाते. त्याबाबत एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत उत्पादन शुल्क विभागाने 442 प्रस्ताव पाठवले असून 248 जणांकडून बंधपत्र भरून घेतले आहेत. बंधपत्र घेतल्यानंतर देखील 41 जणांनी त्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

Maval : मावळ लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रचाराचा शुभारंभ

अवैध मद्य विक्री प्रकरणी 203 गुन्हे नोंदवण्यात आले असून त्यात 468 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींवर न्यायालयाने एकूण 5 लाख 83 हजार 100 रुपये आर्थिक दंड ठोठावला आहे. दहा आरोपींवर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे.

बिअर आणि वाईन शॉपवर देखील कारवाया करण्यात आल्या आहेत. एप्रिल 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत 18 जणांचे परवाने निलंबित करण्यात आले तर चार बिअर व वाईन शॉपी कायमस्वरूपी बंद करण्यात आल्या आहेत. आदेशाचे उल्लंघन केल्याबाबत 34 रूफटॉप हॉटेलवर कारवाई करत 17 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क पुणे विभागात 13 नियमित पथके आणि 3 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. या पथकांमार्फत गस्त घालून वैध मद्य निर्मिती, साठा, वाहतूक आणि विक्री यावर कारवाई केली जाणार ( State Excise Department ) आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.