Mumbai news: भाजपला मोठा धक्का! एकनाथ खडसे यांचा राजीनामा; शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते,
भाजपा वाढवण्याचे ज्यांनी तीन दशके राज्यात काम केले असे एकनाथ खडसे यांनी आज (बुधवारी) भाजपाला रामराम केला आहे. खडसे शुक्रवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले.

खडसे मागील काही वर्षांपासून भाजपवर नाराज होते. त्यामुळे ते पक्षांतर करणार असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. अखेर आज त्यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. खडसे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत नवी राजकीय इनिंग सुरू करत आहेत.

जयंत पाटील  म्हणाले, गेले तीन दशके भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणारे एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचे सांगितले आहे.  शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.  महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहेत. त्यांचे स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल.  भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल, असेही पाटील म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ खडसे यांचे स्वागत!

एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील. तर त्यांचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उस्मानाबाद येथे पत्रकारांशी बोलताना दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III