Mumbai News : वीज क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी दरवर्षी खर्च करणार अडीच हजार कोटी- उर्जामंत्री

एमपीसी न्यूज – राज्यातील वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मितीसाठी आणि विद्यमान पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी दरवर्षी अडीच हजार कोटी खर्च करण्याचा निर्णय उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. यापैकी दीड हजार कोटी पारंपारिक पद्धतीने कृषीपंप जोडण्यासाठी तर उर्वरित एक हजार कोटी औद्योगिक क्षेत्र, नागरी भागातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी तसेच नवीन सबस्टेशन, डीपींसाठी खर्च करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला गेला आहे.

राज्यातील लोकप्रतिनिधींकडून नवीन सबस्टेशन व रोहित्रे बसवण्याची आणि उपविभागाचे विभाजन करण्याची सातत्याने मागणी होत आहे. या विषयांवर डॉ. राऊत यांनी महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महावितरणाचे मुख्यालय, प्रकाशगड इथे बैठक घेतली. बैठकीत उर्जा विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता तसेच महावितरणाचे सर्व संचालक, प्रादेशिक संचालक उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

कृषी पंप वीज धोरणा अंतर्गत पारंपारिक पद्धतीने कृषी पंप जोडण्या देण्यासाठी दरवर्षी दीड हजार खर्च करण्याचे ठरवले आहे. व्यतिरीक्त पायाभूत सुविधा उभारणीसाठी दरवर्षी एक हजार कोटी असे पुढील 3 वर्षांत तीन हजार कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. औद्योगिक, नागरी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्मिती व नवे सबस्टेशन, रोहित्रे बसवण्यासाठी हा निधी खर्च केला जाईल, असे उर्जामंत्री यांनी सांगितले.

औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा उभारणीला आम्ही प्राधान्य देत आहोत. राज्यातील एम आय डी सी क्षेत्रातील पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आम्ही पुढील 3 वर्षात 800 कोटी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. तसेच नवे सबस्टेशन, रोहित्रे बसविणे आणि उपविभाग विभाजन मागणी यासाठी पुढील ३ वर्षात एक हजार कोटी खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय नागरी भागातील वीज क्षेत्रात पायाभूत सुविधा सक्षमीकरणासाठी पुढील 3 वर्षात 1 हजार 200 कोटी खर्च करण्यात येणार आहेत, अशी माहिती राऊत यांनी दिली. यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम पुढील दोन आठवड्यात ठरवून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.