Pune-Mumbai E- Way Accident : बोरघाटात बसच्या धडकेने तीन मजूर ठार; 15 प्रवासी जखमी

एमपीसी न्यूज – पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर बोरघाटात मध्यरात्रीच्या सुमारास बसचा अपघात झाला. या अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून पंधरा जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे एक्स्प्रेस वेवर बराच वेळ वाहतूक कोंडी झाली. 

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर किमी ३६ या ठिकाणी रस्त्याच्या मधोमध एक सिमेंटचा टॅंकर काॅंक्रीटीकरण कामासाठी उभा होता. मुंबईच्या दिशेने भरधाव निघालेल्या एक खाजगी बसने या सिमेंट मिलरला जोरदार धडक दिली. शिवाय अन्य दोन वाहने सुद्धा बसवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. हे तीनही जण बोरघाटात सुरू असणाऱ्या रस्त्याच्या कामावर मजूर म्हणून काम करत होते. दरम्यान या धडकेत बस चालक गंभीर जखमी झाला असून साधारण 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू झाले. जखमींना नजीकच्या कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात घडला. बोरघाटात सध्या रस्त्याचे काम सुरू आहे, वाहतुकीसाठी अडथळा ठरत असलेल्या या रस्ता दुरूस्तीच्या कामामुळे संबंधीत रस्ता अपघाताचे सापळे ठरत आहे, त्यामुळे यात नाहक बळी जाण्याचे प्रकार समोर येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.