New Delhi : पंतप्रधान मोदींचे ट्वीटर अकाऊंट हॅक, नेमकं काय घडलं?
एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्वीटर अकाऊंट पुन्हा एकदा हॅक झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरून आज पहाटेच्या सुमारास बिटकॉइन संदर्भात मोठी घोषणा करण्यात आली होती, मात्र त्यानंतर काहीच वेळातच त्यांचे अकाऊंट हॅक झाल्याचे पंतप्रधान कार्यालयाकडून कळविण्यात आले.
आज पहाटे पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाऊंटवरून बिटकॉइनला अधिकृतपणे मान्यता देत असल्याचे एक ट्विट आले होते. या ट्विटनंतर अर्थजगतात जोरदार चर्चा सुद्धा सुरू झाली. बिटकाॅइन संदर्भातील या मोठ्या घोषणेमुळे खळबळ सुद्धा उडाली होती.
The Twitter handle of PM @narendramodi was very briefly compromised. The matter was escalated to Twitter and the account has been immediately secured.
In the brief period that the account was compromised, any Tweet shared must be ignored.
— PMO India (@PMOIndia) December 11, 2021
दरम्यान, पंतप्रधान मोदींचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचे समोर आले. यामध्ये त्यांच्या ट्वीटर अकाऊंटला लक्ष करत त्यावरून काही ट्वीट करण्यात आले. ज्यामध्ये बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतच्या घोषणेचा समावेश होता. या आशयाचा ट्वीट करून पहिल्यांदा ते ट्वीट डिलीट करण्यात आले मात्र काही वेळाने पुन्हा तेच ट्वीट करण्यात आले.
या संपुर्ण प्रकारानंतर हे ट्वीट तातडीने हटवण्यात आले असून पंतप्रधान कार्यालयाने या हॅकिंगबाबत अधिकृतपणे माहिती दिली आहे. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाऊंटसोबत छेडछाड करण्यात आली असून याबाबतची माहिती ट्वीटरला देण्यात आली आहे. आता त्यांचे अकाउंट अधिक सुरक्षित करण्यात आले आहे. हॅकरने केलेल्या ट्वीटकडे दुर्लक्ष करण्याचे आवाहन पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.