Mumbai : काय आहे ‘किस्सा खतरनाक व्हायरस का’, जाणून घ्या ‘एसीपी प्रद्युम्न’ यांच्याकडून…

एमपीसी न्यूज : गेल्या काही दशकांमध्ये छोट्या पडद्यावर आलेल्या सर्व कार्यक्रमांच्या टीआरपीच्या शर्यतीमध्ये कायमच अव्वल स्थानी राहिलेला कार्यक्रम म्हणजे ‘सीआयडी’ हा क्राईम शो. सध्या हा शो करोनामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण सीआयडीच्या एका भागामध्ये करोनासारख्याच रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याचे प्रकरण एसीपी प्रद्युम्न यांच्या टीमने सोडवले होते. ‘किस्सा खतरनाक व्हायरस का’ असं या भागाचं नाव होतं.

हा भाग २०१३ साली प्रदर्शित झाला होता. सीआयडीमध्ये ‘एसीपी प्रद्युम्न’ ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांनी साकारली होती. त्यांनी नुकतेच हा भाग या मालिकेमधील सर्वात लक्षात राहणाऱ्या भागांपैकी एक असल्याचे मत व्यक्त केलं आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्या संसर्गाबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यापैकी अनेक दाव्यांमध्ये अशाप्रकारच्या जीवघेण्या विषाणूचा संसर्ग होण्याचे संदर्भ काही पुस्तके, चित्रपट आणि वेबसिरीजमध्ये आढळून आल्याच्या चर्चा इंटरनेटवर चांगल्याच रंगल्याचे पहायला मिळालं.

मात्र, करोनासंदर्भात भाकित करणाऱ्या याच कार्यक्रमांच्या यादीमध्ये अनेक दशके भारतीयांचे मनोरंजन करणारे करणाऱ्या ‘सीआयडी’ या क्राइम शोचा समावेश झाला आहे.

याबद्दल बोलताना अभिनेते शिवाजी साटम यांनी सध्याच्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मालिकेमध्ये शूट करण्यात आलेल्या अशाच एका केसबद्दल भाष्य केलं. ‘जीवघेण्या विषाणूसंदर्भातील तो भाग हा या मालिकेतील माझ्यासाठीच्या अविस्मरणीय भागांपैकी एक होता.

सध्याच्या परिस्थितीप्रमाणेच या केसमध्ये एक अनोळखी विषाणूचा संसर्ग लोकांना होत असल्याचे दाखवण्यात आलं होतं’. योगायोगाने करोनाची लक्षणे त्यावेळी दाखवलेल्या लक्षणांसारखीच होती.

‘त्यामुळे त्यावेळी ही केस हाताळताना आम्हाला मास्क आणि सूट वापरावे लागल्याचे दाखवण्यात आलं होतं. अर्थात तेव्हा आम्ही जे दाखवले होते ते एका संसर्गजन्य विषाणूबद्दल होते. मात्र तेव्हा जे दाखवलेले आणि आता जे घडत आहे या सर्वाला संसर्गाचाच आधार आहे,’ असं साटम यांनी म्हटलं आहे.

एका औषध कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला नोकरीवरुन काढून टाकल्यानंतर तो कंपनीला धडा शिकवण्यासाठी एक अनोळखी आणि घातक विषाणूची चोरी करतो आणि त्या माध्यमातून अनेकांना या विषाणूचा संसर्ग होतो अशी या भागाची थीम होती.

‘या व्यक्तीने चोरलेली गोष्ट म्हणजे एक घातक विषाणू आहे. हा विषाणू याआधी माणसाने कधीही पाहिलेला नाही. या विषाणूमुळे केवळ मृत्यूच होतो असं नाही तर हा खूप वेगाने पसरतो. मृत्यू हा या विषाणूच्या संसर्गाचा एकमेव निकाल आहे,’ अशा व्हॉइस ओव्हरने या भागाची सुरुवात होते.

विशेष म्हणजे या भागात विषाणूचा संसर्ग हा शिंकणे, खोकणे आणि हात मिळवल्याने होतो असं दाखवण्यात आलं होतं. हे सध्याच्या करोनाच्या संसर्गाशी साधर्म्य साधणारेच आहे.

२२ वर्ष चालेल्या या मालिकेमधील इन्स्पेक्टर दया आणि इन्स्पेक्टर अभिजीत या पात्रांमुळे कलाकारांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. या कार्यक्रमातील ‘कुछ तो गडबड है’ आणि ‘दया तोड दो ये दरवाजा’ हे संवाद प्रचंड गाजले होते. २०१८ साली २७ ऑक्टोबर रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.