Pune News : आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेत महापालिकेची कामगिरी कौतुकास्पद  – चंद्रकांत पाटील

महापालिकेच्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण; महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून साकारले सेंटर

एमपीसी न्यूज – ‘केवळ प्राथमिक आरोग्याची जबाबदारी असताना कोरोना संसर्गकाळात पुणे महापालिकेने कोणत्याही मुद्द्यावर अडून न बसता नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी महापालिकेची रुग्णालये अद्ययावत तर केलीच शिवाय ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पामध्ये मुंबईलाही मागे टाकत बाजी मारली, म्हणूनच आरोग्य यंत्रणांच्या सज्जतेत पुणे महानगरपालिकेने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे’, असे उद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काढले.

पुणे महापालिकेची डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी ज्येष्ठ नागरीक मोफत वैद्यकीय तपासणी योजना आता कोथरूड येथील सुतार हॅास्पिटलमध्येही डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून सुरु झाली असून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महागड्या चाचण्यांअभावी आजाराचे निदानच करु न शकणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना हे केंद्र मोठा आधार ठरणार आहे.

व्यासपीठावर माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर, उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासणे, आयुक्त विक्रम कुमार, नगरसेविका वासंती जाधव, हर्षाली माथवड, जयंत भावे, राजाभाऊ बराटे, धनराज घोगरे, दिलीप वेडे-पाटील, मंजुश्री खर्डेकर, अल्पना वर्पे, डॉ. श्रद्धा प्रभुणे, कृष्णा डायग्नोस्टिकच्या पल्लवी जैन आदींसह परिसरातील नागरिकांची उपस्थिती होती.

पाटील पुढे म्हणाले, ‘आजारपणामुळे कर्जबाजारी झाल्याचे अनेक प्रकार घडत असतात. अशा परिस्थितीत महापालिकेचे हे केंद्र उपयोगी असेल. त्यामुळे महापालिकेचे मनापासून अभिनंदन करतो. समाजातील शेवटचा माणूस सुखी झाल्याशिवाय समाज सुखी होणार नाही, या विचारानेचे काम सुरु असून डायलिसिसची सुविधा उपलब्ध करुन द्यावी’.

महापौर मोहोळ म्हणाले, ‘पुणे शहराची आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचा शब्द भारतीय जनता पक्षाने पाळला असून भारतरत्न स्व. अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयास लवकरच अंतिम मान्यता मिळणार आहे. यामुळे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय असणारी पुणे महापालिका राज्यातील पहिली महापालिका ठरेल. प्राथमिक सुविधेच्या पलीकडे जाऊन आरोग्य यंत्रणेला सक्षम करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहून आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी, म्हणून महापालिकेचे अविरत कार्य सुरूच राहील’

‘पुणेकरांच्या आरोग्याला प्राधान्य देऊन सुरक्षित आरोग्य यंत्रणा निर्माण केली गेली. 35 ते 40 हजार महिलांची मोफत कॅन्सर तपासणी आजवर करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्याची जबाबदारी राज्य सरकारची असूनही यात राजकारण न आणता नागरिकांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करून कोरोना काळात सर्वोत्तम आरोग्य सेवा प्रदान केली. पुणे महानगरपालिका आज आरोग्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण आहे हे सांगताना अभिमान वाटतो’, असेही महापौर मोहोळ म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ जाधव यांनी केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.