Nashik News : नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रा. रहाळकर, उपाध्यक्षपदी प्रा. फडके, मोंढे

0

एमपीसीन्यूज – नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी प्रा. सूर्यकांत रहाळकर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून प्रा. दिलीप फडके व चंद्रशेखर मुंढे यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेचे कार्यवाह म्हणून राजेंद्र निकम यांचीही निवड झाली.

पुढील दोन वर्षासाठी ही नियुक्ती असणार आहे. या निवडणुकीत संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्यांच्या निवडणुकीत विनायक देशपांडे, मोहन रानडे, चंद्रशेखर वाड, भास्कर कोठावदे, जयदीप वैशंपायन, सरोजिनी तारापूरकर, सचिन महाजन आणि पांडुरंग अकोलकर या सदस्यांची बिनविरोध निवड झाली.

नाशिक एज्युकेशन सोसायटीचे 2023 हे शतक महोत्सवी वर्ष आहे. याच कार्यकारणीच्या कार्यकाळात संस्थेचे शतक महोत्सवी वर्ष येत असल्याने या कार्यकारिणीला विविध उपक्रम राबविण्याची संधी मिळणार आहे.

संस्थेच्या स्थापनेचा इतिहास

मिशन सोसायटीच्या सेंट जॉर्जेस हायस्कूलचे ‘नाएसो’च्या पेठे विद्यालयात रूपांतर

‘सेंट जॉर्जेस हायस्कूल’ च्या विद्यार्थी संख्येवर परिणाम झाल्यामुळे तत्कालीन मिशनरी – मिशन सोसायटीला आपली शाळा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला. तेव्हा शाळेतील ध्येयवादी शिक्षकांनी स्वत: शाळा चालविण्याचे ठरविले. त्यांत कै. शं. दि. तथा नानासाहेब अभ्यंकरांचा पुढाकार होता.

गावातील शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मदतीने 1  एप्रिल 1923  रोजी त्यांनी ‘नाशिक एज्युकेशन सोसायटी’ची स्थापना केली. शाळा ताब्यात घेतली. रावबहादूर वि. अ. गुप्ते संस्थेचे अध्यक्ष झाले व मो. रा. गोडेबोले मुख्याध्यापक.

1923 मध्ये मुंबई प्रांताचे शिक्षणमंत्री रॅग्लर र. पु. परांजपे ह्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी परिश्रमपूर्वक आलिशान समारंभ केला आणि मंत्र्यांनी शाळेच्या सर्व सवलती तशाच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशारितीने अनेक अडचणींना सामोरे जात जात शाळेची, संस्थेची वाटचाल धिम्या गतीने चालू होती.

पण 1938 मध्ये एक मोठे संकट उभे राहिले. काही आजीव सदस्य व शिक्षक मुलांसह, रजिस्टरांसह बाहेर पडले व त्यांनी ‘न्यू इंग्लिश स्कूल’ ही संस्था सुरू केली. मुलांच्या संख्येचा प्रश्न उभा राहिला. तेव्हा शाळेचे माजी विद्यार्थी कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी त्यांच्या शाहू छत्रपती बोर्डिंगची नव्वद मुले पाठविली व शाळा परत सुरू झाली.

1938 नंतर संस्थेला सरकारने जागा दिली. सह्याद्री विमा कंपनीने कर्ज आणि पेठे बंधूंनी उदार देणगी दिली. शहराच्या मध्यवर्ती भागात पेठे विद्यालयाची देखणी इमारत उभी राहिली. त्याचवेळी सरकारी हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री. ना. ह. तथा नानासाहेब कर्वे सुपरीटेंडट म्हणून रूजू झाले. श्री. वामन केशव तथा दादा खरे त्यांच्या सहका-यांसह संस्थेत आले. संस्थेची, शाळेची सर्व बाजूंनी भरभराट होऊ लागली.

जुना पेशवे वाडा- सेंट जॉर्जेस हायस्कूल

‘सेंट जॉर्जेस हायस्कूलचे’ रुपांतर ‘पेठे विद्यालय’ असे झाले. शाळेच्या नामकरणाचा भव्य समारंभ 15 जानेवारी 1944 रोजी बॅ. बाबासाहेब जयकर यांच्या हस्ते संपन्न झाला. संस्थेच्या इतिहासातील हा मोठा भाग्य योग होता.

यानंतरच्या काळात मातोश्री रामप्यारीबाई सारडा कन्या विद्यामंदिर, ति. झ. विद्यामंदिर, भगूर, नवीन इंग्रजी शाळा, ओझर, सेठ धरमदास सामळदास कोठारी कन्या शाळा, नाशिकरोड, साडीओ मेरी हायस्कूल, माध्यमिक विद्यालय सिडको व नाशिकरोड, मराठी माध्यमाच्या व इंग्रजी मिडीयम हायकूलच्या इमारतीत तसेच सिडको येथे इंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक शाळा संस्थेने सुरू केल्या.

काळाजी गरज जाणून ‘इन्स्टिटयूट ऑफ टेक्निकल अँन्ड करिअर डेव्हलपमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून दहा विषयांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू आहेत. वेळुंजे येथील आश्रमशाळाही हळूहळू आकारास येत आहे. आज नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळांतून 25,000 विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाचा व तंत्रशिक्षणाचा लाभ घेत आहेत.

ह्या प्रवासात अध्यापकांची कामगिरीही गौरवास्पद अशीच आहे. चारजण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाले आहेत. एका अध्यापकास ‘बाहुलीनाट्य’ कार्यानुभव पुरस्कार मिळाला आहे. तर संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षात एका अध्यापिकेस महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले पुरस्काराने सन्मानित केले आहे. ही परंपरा यापुढेही अखंड राहील असा विश्वास वाटतो.

या निष्ठावंत अध्यापकांना संस्थेच्या व्यवस्थापनात सहभागी होता यावे म्हणून 1972 मध्ये संस्थेने घटना बदल केला. ‘आजीव सदस्य मंडळ’ जाऊन शिक्षक मंडळ अस्तित्वात आले. त्यात शिक्षक प्रतिनिधी असून कार्यकारी मंडळ संस्थेचे काम पाहतात.

संस्थेचे सदभाग्य हे की संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेला योग्य दिशा व गती देणारे खा. गो. ह. देशपांडे, श्री. ग. ज. म्हात्रे, यांच्यासारखे नामवंत अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकारी मंडळ सदस्य, शिक्षक मंडळ सदस्य तसेच ब. चिं. सहस्त्रबुध्दे, स. न गोसावी यांच्यासारख्या कार्यवाहांची परंपरा लाभली ती आजही खंडित झालेली नाही.

1948 मध्ये संस्थेने कै. नामदार बाळासाहेब खेर यांच्या अध्यक्षतेखाली रौप्यमहोत्सव साजरा केला. 1974 मध्ये वि. वा. शिरवाडकर व प्रख्यात उद्योगपती आबासाहेब गरवारे यांच्या उपस्थितीत सुवर्ण महोत्सव संपन्न झाला. 1997-98 हे वर्ष अमृत महोत्सवी वर्ष म्हणून मोठया उत्साहात साजरे झाले. आता सन 2023 ला शतक महोत्सवी वर्ष नुतन कार्यकारिणीच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात साजरे होईल याबाबत कोणाच्याही मनात तिळमात्र शंका नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.