New Delhi News : ‘भारत बंद’ला बँक कर्मचारी संघटनांचा पाठिंबा

एमपीसीन्यूज : शेतकऱ्यांनी पुकारलेल्या 8 डिसेंबरच्या भारत बंदला आता बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी पाठींबा दिला आहे. या भारत बंदमध्ये बँक पूर्ण शक्तीनिशी सहभागी होत आहेत, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन, महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लॉईज फेडरेशन संघटनेने जाहीर केले आहे.

मात्र, उद्या, मंगळवारी बँक कर्मचारी बिल्ले लावून केंद्र सरकारचा निषेध करणार आहेत. तसेच निदर्शन, धरणे, मोर्चा कार्यक्रमात बँक कर्मचारी मोठ्या प्रमाणात सहभागी होतील. त्यामुळे बँकिंग सेवेवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

देशभरातील शेतकरी गेल्या दहा दिवसांपासून दिल्लीच्या उंबरठ्यावर आंदोलन करीत आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांमध्ये दररोज मोठ्या संख्येत वाढ होत आहे. तीन नवीन शेतकरी सुधारणा कायदे रद्द करा, अशी या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे. शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.

देशातील भारतीय मजदूर संघ सोडता इतर सर्व संघटनांनी 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी सार्वत्रिक संप केला. त्यात देखील कामगार विरोधी कायदे मागे घ्या, या बरोबरच शेतकरी विरोधी कायदे परत घ्या, ही मागणी देखील आग्रहाने मांडली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.