Talegaon : ‘माणसाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे’

डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांची खंत

राज्यस्तरीय कथा-कविता स्पर्धेत डॉ. मीरा सुंदरराज व वंदना पोंक्षे प्रथम   

एमपीसी न्यूज – आज माणसाला अभिव्यक्त होता येत नाही. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत आहे. सध्याची परिस्थिती पाहता माणसाला बोलूच दिले जात नाही. आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असल्याचे लोक विसरू लागले आहेत. त्यामुळे सामान्य माणसाची मुस्कटदाबी होत आहे, अशी खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केली. तसेच या परिस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक संस्था कार्य करीत आहे. परंतु साहित्य कला संस्कृती मंडळाचे याबाबतचे कार्य गौरवास्पद आहे, असे कौतुकही त्यांनी केले.  

साहित्य कला आणि संस्कृति मंडळ(ट्रस्ट)तर्फे गेली ३८ वर्षे सातत्याने घेण्यात येणा-या राज्यस्तरीय मराठी गो.नि.दांडेकर कथा, मनमोहन नातू कविता स्पर्धेचा गुणगौरव आणि पारितोषिक वितरण समारंभ नुकताच पार पडला. यावेळी ते बोलत होते. तळेगाव दाभाडे येथील डॉ. राम मनोहर लोहिया समाजवादी विद्यापीठाच्या सभागृहात डॉ. कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी, बबन पोतदार, संस्थेचे अध्यक्ष सहदेव मखामले, कार्याध्यक्ष डॉ. संभाजी मलघे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, राजश्री म्हस्के यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कोषाध्यक्ष शैलेश मखामले,  सदस्य श्रीकांत पेंडसे, प्रा. प्रमोद धिवार, प्रा. संदीप भोसले, प्रा. अजित जगताप, सदस्य सुरेश खळदे, सचिन शिंदे, सदस्य शत्रुघ्न यादव, सदस्य काशिनाथ निंबळे, सदस्य किरण जाधव,  ज्येष्ठ सदस्य शशिकांत घोडेकर आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात पुढे बोलताना डॉ. कोत्तापल्ले म्हणाले की, जरी सर्वसामान्य माणसाची मुस्कटदाबी होत असेल तरी त्यांना बोलण्याचा हक्क साहित्य कला आणि संस्कृती मंडळ उपलब्ध करून देत असल्याने युवकाने पुढे येऊन आपले विचार निर्भिडपणे मांडले पाहिजे. तसेच यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न.म.जोशी बोलताना म्हणाले मनमोहन नातू आणि गो.नी. दांडेकर यांचा वारसा ही संस्था कोणताही स्वार्थ न ठेवता पुढे नेत असल्याने तळेगाव शहराचे नाव साहित्य क्षेत्रात अग्रगण्य होत चालले आहे. यावेळी बबन पोतदार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सहदेव मखामले यांनी गेल्या 38 वर्ष राज्यस्तरीय कथा कवितेचा आढावा आणि स्पर्धकांचा अनुभव विषद केला. याप्रसंगी डॉ. चव्हाण यांच्या अमृत मोहिनी यांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले कविता संग्रहावर भाष्य करताना मखामले म्हणाले या कविता संग्रहाने कवितेच्या जगात एक स्त्री मनाच्या व्यापक विचाराचे नवीन दालन उघडले आहे.

संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रा. संभाजी मलघे यांनी साहित्य कला आणि संस्कृती मंडळातर्फे पुढील काळात एक दिवसीय साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलन भरविण्याचा मानस व्यक्त केला. साहित्य कला आणि संस्कृती मंडळाने निर्माण केलेला वसा आणि वारसा जपण्यासाठी भविष्यात ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाचन चळवळ उभी करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात सलीम मुजावर यांच्या बासरी वादनाने झाली. प्रास्ताविक संस्थेचे विश्वस्त सचिव अर्जुन गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गाढवे व डॉ. अमृता चव्हाण यांनी केले तर आभार कार्यवाहक प्राध्यापक अशोक गायकवाड यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

गो. नी. दांडेकर कथा आणि मनमोहन नातू कविता स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –  कथा विभाग प्रथम क्रमांक डॉ. मीरा सुंदरराज(वानवडी पुणे), द्वितीय क्रमांक अॅड्. गजानन प्रधान (हिंगणे खुर्द पुणे) जयश्री घुले (वानवडी पुणे), तृतीय क्रमांक प्रकाश धुमाळ (पेडणे, गोवा) व प्रितम वेदपाठक(पिंपरी), विशेष नैपुण्य संतोष गेडाम(वाई सातारा), अलका विंचू(खेड रत्नागिरी), डॉ. दिनेश फडणीस (नरसिंहवाडी कोल्हापूर), सुनिता वाणी (चिंचवडगांव), विमल खाचणे (कर्वेनगर पुणे)

तसेच कविता विभाग प्रथम क्रमांक वंदना पोंक्षे (पुणे), द्वितीय क्रमांक आशा मेलंग(कोथरुड पुणे) व रेखा खराबे (बाणेर पुणे), तृतीय क्रमांक जयश्री घुले(वानवडी, पुणे) व सुप्रिया जोगदेव(पुणे) विशेष नैपुण्य : कवयित्री ऋचा कर्वे (पुणे), मोहन पाटील(पालशेत रत्नागिरी), मीना सातपुते (वडगाव पुणे), रजनी पाटील(तळेगांव दाभाडे), डॉ. शुभदा गद्रे (कोथरुड पुणे)

तसेच विद्यालय-महाविद्यालय गट प्रथम क्रमांक नेहा सावंत(कुंडी रत्नागिरी) द्वितीय क्रमांक गायत्री शिरसाट(खेडे नाशिक) तृतीय क्रमांक कुमार पाटोळे (फलटण सातारा) काव्य सादरीकरण स्पर्धा (पुणे जिल्हा) प्रथम क्रमांक ऋचा कर्वे (पुणे),  द्वितीय क्रमांक अमृता जोशी(मुंडवा मांजरी), तृतीय क्रमांक मंगला अष्टपुत्रे(पुणे), चतुर्थक्रमांक मेघा तेलंग(पुणे), पाचवा क्रमांक प्रभावती सागडे (तळेगाव दाभाडे), सहावा क्रमांकजयंत कोपर्डेकर(पुणे), सातवा क्रमांक रामचंद्र पाचुणकर (बावधन) यांना देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.