Nigdi : अन् पोलीस आयुक्त पोहोचले ‘ऑन द स्पॉट’

भुयारी मार्गाच्या संथ कामामुळे महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा

एमपीसी न्यूज – जुना पुणे-मुंबई महामार्गावर निगडी येथे (Nigdi) महापालिकेच्या वतीने भुयारी पादचारी मार्गाचे काम संथ गतीने सुरु आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत आहेत. गुरुवारी (दि. 27) रात्री पुन्हा एक अपघात झाला. त्यामुळे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी भुयारी मार्गाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. संथ गतीने सुरु असलेले काम लवकर पूर्ण करण्याबाबत आयुक्त चौबे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

भुयारी मार्गाचे काम संथ गतीने –

निगडी येथील मधुकरराव पवळे उड्डाणपूल ते भक्ती शक्ती उड्डाणपूल या दरम्यान महामार्गावर पादचारी भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. बी के खोसे या ठेकेदाराकडून हे काम केले जात आहे. या कामासाठी साडेतीन कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे. 15 महिन्यात हे काम पूर्ण करण्याची मुदत होती. मार्च-एप्रिल 2022 मध्ये कामाला सुरुवात झाली. 8 जून 2023 रोजी या कामाची 15 महिन्यांची मुदत संपली.

मुदत संपल्यानंतर हे काम अवघे 30 टक्के झाले होते. त्यामुळे या कामाला 8 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. 15 महिन्यात 30 टक्के काम झाले. उर्वरित 70 टक्के काम तीन महिन्यात पूर्ण होणार का; असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वारंवार घडताहेत अपघात –

भुयारी मार्गाच्या कामासाठी महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली (Nigdi) आहे. महामार्गावरील वाहतूक सेवा रस्त्यावर येत असल्याने दररोज वाहतूक कोंडी होत असते. त्यातच किरकोळ अपघातांसह मोठे अपघात देखील वारंवार होत आहेत. 25 जून रोजी पहाटे एलपीजी वाहतूक करणारा टँकर याच ठिकाणी पलटी झाला.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. तब्बल 18 तासानंतर परिस्थितीत पूर्ववत झाली. त्यानंतर 27 जुलै रोजी पुन्हा एका टँकरचा अपघात झाला. 17 एप्रिल रोजी याच ठिकाणी टँकर आणि कंटेनरचा अपघात झाला. याशिवाय दुचाकी आणि इतर वाहनांचे किरकोळ अपघात वारंवार होत आहेत.

पोलीस आयुक्तांची घटनास्थळी भेट –

भुयारी मार्गाच्या कामामुळे अरुंद झालेल्या महामार्गावर सातत्याने अपघात घडत असल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. वाहतूक पोलीस तैनात असले तरी बेशिस्त वाहन चालकांना आवर घालणे कठीण आहे. भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्यास महामार्गाच्या दोन्ही बाजू सुरळीत सुरु करता येणार आहेत.

या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी शुक्रवारी (दि. 28) सकाळी या ठिकाणी भेट दिली. यावेळी महापालिकेचे अधिकारी देखील उपस्थित होते. भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे. काम पूर्ण करत असताना त्याच्या गुणवत्तेत कुठलीही कमतरता येणार नाही, याची खबरदारी घेण्याबाबत पोलीस आयुक्त चौबे यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

Nigdi : मणिपूर घटनेप्रकरणी महिलांचा तहसील कार्यालयावर मोर्चा

पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाचे सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल कुबडे म्हणाले, “महामार्गावर बऱ्याच दिवसापासून भुयारी मार्गाचे काम सुरु आहे. या ठिकाणी अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली आहे. पुढील काही दिवसात भुयारी मार्गाचे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहे. दरम्यान, वाहन चालकांनी मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत. वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.”

निगडी वाहतूक विभागाच्या पोलीस निरीक्षक विजया कारंडे म्हणाल्या, “भुयारी मार्गाच्या कामाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस असतात. भविष्यात कुठलाही अपघात होऊ नये यासाठी वाहतूक पोलीस खबरदारी घेत आहेत. गुरुवारी रात्री अपघात झाला. त्यानंतर शुक्रवारी सकाळी कामासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांना त्रास होऊ नये यासाठी तत्काळ अपघातग्रस्त टँकर बाजूला घेण्यात आला. त्यामुळे शुक्रवारी सकाळी वाहतूक कोंडी झाली नाही.”

 

संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करा – सचिन चिखले

भुयारी मार्गावरील रस्त्याचे काम झालेले असल्याने स्पीड ब्रेकर काढून वाहतुक सुरळीत करण्यात यावी. त्याचप्रमाणे दोन्ही बाजुला संरक्षण जाळी लावण्यात यावी. ज्या ठेकेदाराने कामाला विलंब केला आहे. त्याच्यावर कारवाई करावी. अशी मागणी मनसेचे शहराध्यक्ष आणि माजी नगरसेवक सचिन चिखले यांनी प्रशासनाकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.