Nigdi Corona News : कोरोना बाधितांना आंब्याच्या पेट्यांचे वाटप करून कोविड योद्धयांचा वाढदिवस साजरा

एमपीसी न्यूज – निगडी पोलीस ठाणे व प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने कोविड योद्ध्ये विजय मुनोत व डॉ. राजेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आकुर्डी रुग्णालयात कोविड बाधित रुग्णांना आंब्यांच्या पेट्यांचे वाटप करण्यात आले.

या प्रसंगी आकुर्डी रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. सुनीता साळवे, डॉ. राहुल साळुंखे, निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, उपनिरीक्षक केरबा माकणे, जैन सोशल डायमंड ग्रुपचे संतोष छाजेड, संपर्क प्रमुख विजय मुनोत, समिती अध्यक्ष विजय पाटील उपस्थित होते.

अक्षय तृतीया म्हणजे साडे तीन महूर्तांपैकी एक महत्त्वपूर्ण मुहूर्त. परंतु कोविड 19 च्या दुसऱ्या लाटेमुळे शहरात हा महत्वपूर्ण सण साजरा करण्यास मर्यादा आल्या. पिंपरी चिंचवड शहरात लॉकडाऊनमुळे आंब्यांची आयात गतवर्षीच्या तुलनेत कमी प्रमाणात झाली. त्यातच कोविड रुग्णांची संख्याही रुग्णालयांमध्ये मोठया प्रमाणात आहे.

वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनिता साळवे म्हणाल्या, “समाजातील उपेक्षित आणि गरजू व्यक्तींना अशा पद्धतीने आपुलकीने भेट देणे व त्यांचे तोंड गोड करणे नक्कीच कौतुकास्पद आहे. समितीने दिलेल्या आंब्यांचे रुग्णांना वाटप केल्याने त्यांचा आनंद सणाच्या दिवशी द्विगुणित झाला आहे”.

समिती अध्यक्ष विजय पाटील म्हणाले,” गेल्या 15 महिन्यांपासून कोविड संक्रमण काळात जिवाची पर्वा न करता कोविड योद्ध्ये डॉ. राजेश पाटील, विजय मुनोत हे शहरात कोविड रुग्णांना सेवा देत आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध झाली. त्यांच्या वाढदिवशी आकुर्डी रुग्णालयातील कोविड बधितांना आज आंब्याचे वाटप करण्यात आले.”

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर म्हणाले, “वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाने शहरातील स्वयंसेवी संस्थांसोबत वेळोवेळी समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचे काम पोलीस ठाणे करत आहे. लॉकडाऊन काळात वंचितांना व गरजूंना मदत देणे हा प्रमुख उद्देश आहे. समितीचे स्वयंसेवक पोलीस मित्र गेले अनेक वर्षांपासून पोलीस विभागाला सहकार्य करीत आहेत.”

जैन सोशल डायमंड ग्रुपचे संतोष छाजेड म्हणाले, “सध्या राज्यात तसेच आपल्या शहरात कोरोना विषाणूने मोठ्या प्रमाणात संक्रमण केले आहे. अशा कठीण काळात सर्वांनी एकत्रितपणे कार्य करून या महामारीला हद्दपार करायचे आहे. त्यासाठी सर्व स्वयंसेवी संस्था यांनी एकत्रितपणे प्रशासनाला सहकार्य करणे जास्त महत्वाचे आहे. प्राधिकरण नागरी सुरक्षा समिती संमवेत आमची संस्था वेळोवेळी सामाजिक उपक्रम राबवित असते.”

या उपक्रमास रसिक पिसे, राजेश कर्णावट, विश्वजित हरगुडे, जयकुमार गुजर, मिलिंद सैंदाणे, आकुर्डी रुग्णालय कर्मचारी अशोक लोखंडे यांनी विशेष सहकार्य केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.