Nigdi Crime News : गांजा विक्री प्रकरणी एकास अटक; सव्वादोन किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला अटक केली. त्याने ज्या महिलेकडून गांजा आणला त्या महिलेच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 30) दुपारी ओटास्कीम, निगडी येथे करण्यात आली.

तात्या ऊर्फ तायप्पा बाबू पवार (वय 40, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, ओटास्कीम निगडी) आणि एक महिला आरोपी असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस कर्मचारी मनोज बन्सीलाल राठोड (वय 36) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडे गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सोमवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास पोलिसांनी छापा घालून 55 हजार 200 रुपये किमतीचा दोन किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. आरोपी पवार याने हा गांजा महिला आरोपीकडून विकत आणला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यामुळे त्या महिलेविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक ओमासे तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.