Nigdi : वाहनांची तोडफोड करणा-या चौघांना बेड्या; निगडी पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – चाकूचा धाक दाखवून एकाला लुटले आणि रस्त्याच्या बाजूला पार्क केलेल्या 12 वाहनांची तोडफोड केली. हा प्रकार रविवारी (दि. 2) पहाटे चार वाजताच्या सुमारास चिंचवड येथील थरमॅक्स चौकाजवळ घडला. याप्रकरणी निगडी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे.

राहुल रामचंद्र दौंड (वय 30), रोहित आश्रुबा आव्हाड (वय 21, दोघे रा. अजंठानगर, चिंचवड), रोहित चंद्रकांत मुद्दे, आकाश चंद्रकांत मुद्दे (दोघे रा. आंबेडकर नगर, चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी राजेश पोपट कांबळे (वय 37, रा. आंबेडकर नगर, चिंचवड) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चारच्या सुमारास आरोपींनी थरमॅक्‍स चौकाजवळ फिर्यादी राजेश यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून त्यांच्या खिशातून जबरदस्तीने एक हजार 600 रुपये काढून घेतले. त्यानंतर राजेश यांचा टेम्पो आणि पाच दुचाकी, सहा तीनचाकी वाहनांची तोडफोड करून सुमारे 40 हजार रुपयांचे नुकसान केले.

या प्रकरणाचा तपास करत असताना पोलीस हवालदार किशोर पढेर यांना माहिती मिळाली की, तोडफोड करणारे दोघेजण दुर्गानगर येथील सीएनजी गॅस पंपाच्या समोर थांबले आहेत. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून आरोपी राहुल दौंड आणि रोहित आव्हाड या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचे मान्य करत त्यांचा एक साथीदार रोहित मुद्दे हा सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधील सुभाष नगर येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी तात्काळ बार्शीकडे पथके पाठवून रोहितला अटक केली. तर चौथा साथीदार आकाश याला भोसरी येथून अटक केली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त स्मिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पिंपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे, सहाय्यक पोलीस निरीक्षक लक्ष्मण सोनवणे, प्रशांत आरदवाड, उपनिरीक्षक पी आर लोखंडे, के बी माकणे, सहाय्यक पोलीस फौजदार शंकर बांगर, पोलीस कर्मचारी किशोर पढेर, सतीश ढोले, विलास केकाण, रमेश मावसकर, विनोद व्होनमाने, चंद्रकांत वाघमारे, अमोल साळुंखे, भूपेंद्र चौधरी, विजय बोडके, राहुल मिसाळ, तुषार गेंगजे यांच्या पथकाने केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.