Pimpri: जाता-जाता आयुक्त महापालिकेची इमारत व्यापारी तत्वावर वापरासाठी देणार!; महापौरांसह गटनेत्यांच्या बैठकीतील निर्णय

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर जाता-जाता जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील महापालिकेची दिमाखात उभी असलेली चार मजली इमारत व्यापारी तत्तावर वापरासाठी देणार आहेत. त्यातून नवीन इमारतीच्या कामासाठी महापालिकेस ‘फंड’ मिळणार असल्याचे कारण दिले आहे. आश्चर्य म्हणजे गटनेत्यांसोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला असून त्याचे इतिवृत्त समोर आले आहे. नवीन इमारतीची जागा, दर्शनी भाग, वाढीव 99 कोटींचा खर्च यावर आक्षेप असताना आता जुनी इमारत व्यापारी तत्तावर वापरासाठी दिली जाणार असल्याने इमारतीच्या वादाला नवे वळण मिळाले आहे. पहिल्यांदाच सत्तेत आलेला भाजपच्या राजवटीत महापालिकेची इमारतच व्यापारी वापरासाठी दिली जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

प्रशासकीय कामकाजासाठी महापालिका मुख्यालयाच्या बाजूला असलेल्या महिंद्रा कंपनी जवळील ‘आर टू आर’ अंतर्गत मिळालेल्या जागेवर नवीन इमारत बांधण्याचे नियोजित आहे. त्याचे सादरीकरण 17 डिसेंबर 2019 रोजी पदाधिकारी, अधिका-यांना झाले. महापौर उषा ढोरे, स्थायी समिती सभापती विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते नाना काटे, मनसेचे गटनेते सचिन चिखले, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मकरंद निकम, कार्यकारी अभियंता संजय घुबे, उपअभियंता महेश बरीदे, वास्तुविषारद उषा रंगराजन, अनुप विणेकर, कुलकर्णी उपस्थित होते. रंगराजन यांनी इमारतीच्या कामाचे सादरीकरण केले.

सर्व पदाधिकारी, आयुक्त, सर्व विभागप्रमुख जुन्या इमारतीमध्ये आणि उर्वरीत विभाग नवीन इमारतीत, अथवा सर्व पदाधिकारी जुन्या इमारतीत व आयुक्तांसह प्रशासन नवीन इमारतीमध्ये, स्थायी समितीचे सभापती वगळून सर्व पदाधिकारी जुन्या इमारतीमध्ये आणि आयुक्त, सर्व विभागप्रमुख, स्थायी समिती सभापती नवीन इमारतीमध्ये किंवा सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी नवीन इमारतीमध्ये असावेत. महापालिकेची सध्याच्या जुनी इमारतीमध्ये काही प्रमाणात नुतणीकरण करुन अन्य कारणांसाठी वापर करावी यावर चर्चा झाली.

त्यावर सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सर्व पदाधिकारी, अधिका-यांची व्यवस्था एकाच इमारतीमध्ये करावी, अशी सूचना केली. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी त्याला दुजोरा दिला. तसेच जुन्या इमारतीचा व्यापारी तत्वावर वापर करुन त्यामधून नवीन इमारत बांधण्यास महापालिकेस फंड मिळू शकतो, असे आयुक्तांनी सुचविले. त्यानुसार तसा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच आयुक्त कार्यालय तिस-या मजल्यावर, 300 लोकांसाठी बहुउद्देशिय हॉल आणि पत्रकारांसाठी तळमजल्यावर कक्ष करण्यात येणार आहे.

नवीन इमारतीच्या जागेबाबत आक्षेप आहेत. अनेक तक्रारी आहेत. इमारतीच्या दर्शनी भागावरुन वाद सुरु आहे. तसेच इमारतीचा खर्च 200 कोंटीवरुन 299 कोटी रुपयांवर केला आहे. त्यातच आता जुनी इमारत इमारत व्यापारी तत्तावर वापरासाठी देण्यात येणार असल्याने इमारतीच्या वादाला नवे वळण मिळाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.