Nigdi: नियमित सराव हिच यशाची गुरुकिल्ली -लक्ष्मण गोगावले

एमपीसी न्यूज – शालेय जीवनात नियमितपणे गणिताचा सराव केल्यास अवघड वाटणारे विषय देखील सोपे होऊ शकतात. प्रामाणिकपणे अभ्यासातील सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे, असे मत गणिततज्ञ लक्ष्मण गोगावले यांनी व्यक्त केले. यमुनानगर निगडी येथील मॉडर्न हायस्कुलमध्ये ‘गणितासाठी सोपे अभ्यासतंत्र’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

यावेळी प्राचार्य सतीश गवळी, संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार, शिक्षक गंगाधर वाघमारे, अमोल नवलपुरे, राजीव कुटे, शिवाजी अंबिके, मीना अधिकारी, अमृत गायकवाड, मनीषा पाचारणे, कविता गायकवाड, वैशाली देसले आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांच्या मनात लहानपनापासून गणित विषयाबद्दल भीती असते. तर, याच वयात अनेक गणिती संकल्पना न समजल्याने गणित अवघड वाटते. मात्र, यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांनी नियमित सराव आणि काही सोपी अभ्यासतंत्र अवलंबल्यास अवघड विषय सोपा वाटू लागतो, असे गोगावले म्हणाले.

यावेळी त्यांनी अनेक अंकी संख्यांचा गुणाकार काहीच सेकंदात करण्याचे सोपे तंत्र सांगितले. तर, चौकटीमधील आडव्या उभ्या बेरजेची गणिते विद्यार्थ्यांकडून सोप्या पद्धतीने सोडवून घेतली. गोगावले यांनी विद्यार्थ्यांच्या जन्मतारखेवरून अचूक वार सांगितल्यावर विद्यार्थी आश्चर्यचकित झाले. दर अठ्ठावीस वर्षांनी दिनदर्शिकेची पुनरावृत्ती होत असल्याचे उदाहरणांसह पटवून दिले. यासाठी आवश्यक एक तक्ता पाठ असल्यास ही किमया विद्यार्थी देखील करू शकतात हे त्यांनी सांगितले.

मुलांच्या मनातील गणितातील भीती कमी व्हावी व मुलांना गोडी लावावी यासाठी त्यांनी गणितातील काही खेळ ,गमती जमती , मोठमोठी आकडेमोड चटकन करण्याची पद्धती त्यांनी सांगितल्या. हसतखेळत गणितातील अनेक संकल्पना सोप्या भाषेत सांगितल्यामुळे मुलांची गणित विषयातील भीती नाहीशी झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे, सहकार्यवाह प्राध्यापिका ज्योत्स्ना एकबोटे यांनी केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.