Nigdi News: प्राधिकरणात ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोरोना ‘अँटीजेन’ तपासणी

एमपीसी न्यूज – जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यावेळी कोरोना फैलावाचा वेग कमी व्हावा, या अनुषंगाने ज्या व्यक्तींचा जनसंपर्क जास्त आहे, अशा ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची महापालिकेकडून तपासणी केली जात आहे. निगडी, प्राधिकरणात आज (गुरुवारी) ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोरोनाची ‘अँटीजेन’ तपासणी करण्यात आली. तसेच लक्षणे व मास्कविना फिरणाऱ्यांचीही चाचणी केली जात आहे.

व्यवसाय व नोकरीच्या निमित्ताने काही व्यक्तींचा जनसंपर्क अधिक लोकांशी येतो. त्या माध्यमातून कोविड आजाराचा प्रसार अधिक वेगाने होतो. हे अभ्यासातून पुढे आले आहे. दुस-या लाटेत ‘स्प्रेडर’ व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे लक्षात घेऊन सुपर स्प्रेडरचे विशेष सर्वेक्षण करून, त्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

आकुर्डी रुग्णालयाच्या प्रमुख डॉ. सुनीता साळवे म्हणाल्या, ‘सुपर स्प्रेडर’ व्यक्तींची कोरोना ‘अँटीजेन’ चाचणी करण्यात येत आहे. शहरातील रुग्णसंख्येचे आकडे कमी झाले आहेत.   अनेक नागरिक मास्क वापरत नाहीत. त्यांच्यामुळे दुस-या लोकांना त्रास होवू नये. मास्कविना फिरणा-यांना कोरोनाची लक्षणे दिसत असल्यास त्यांना रस्त्याच्या बाजूला घेवून त्यांची अँटीजेन चाचणी केली जात आहे.

‘हे’  आहेत ‘सुपर स्प्रेडर’ !

# छोटे व्यावसायिक गट – किराणा दुकानदार, भाजीवाले तसेच पदपथावर विविध वस्तूंची विक्री करणारे इतर विक्रेते, हॉटेल मालक आणि वेटर्स

# घरगुती सेवा पुरविणारे – दूधवाला, मोलकरणी आणि इतर नोकर, गॅस सिलिंडर वितरण करणारे कर्मचारी, इलेक्ट्रिक विषयक कामे, नळजोडणी, दुरुस्ती अशी घरगुती कामे करणा-या व्यक्ती, लॉन्ड्री, पुरोहित.

# वाहतूक व्यवसायातील लोक – मालवाहतूक करणारे ट्रक ड्रायव्हर्स, टेम्पो चालक, रिक्षाचालक

# वेगवेगळी कामे करणारे मजूर – हमाली, रंगकाम, बांधकाम कामगार, पीएमपीएमएल ड्रायव्हर, कंडक्टर, सिक्युरिटी गार्ड, आवश्यक सेवेतील शासकीय – निमशासकीय कर्मचारी, पोलीस – होमगार्डस इत्यादी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.