Nigdi : ..अन्यथा फ क्षेत्रिय अधिकारी व आरोग्य अधिकाऱ्यांना गवतांचा हार घालणार!

एमपीसी न्यूज –  निगडी अमरधाम स्मशानभूमीमधील दफनभूमीमध्ये मोठ्या ( Nigdi ) प्रमाणात गवतं, काटेरी झाडे वाढलेली आहेत.यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.  तक्रारी करून देखील महापालिका प्रशासनाकडून जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसांत दफनभूमीतील गवतांच्या छाटणीचे काम सुरु करण्यात यावे अन्यथा फ क्षेत्रिय अधिकारी , आरोग्य अधिकारी यांना दफनभूमीतील गवतांचा हार घालण्यात येईल, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी दिला आहे.

याबाबत दिपक खैरनार यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी स्मशानभूमीतील झाडांची देखरेख तसेच गवतांची छाटणी कामी नियुक्त करण्यात आलेल्या ठेकेदाराकडून ‘दफनभूमीतील गवत छाटणीच्या कामाची ऑर्डर आम्हाला मिळाली नसल्याने, ते काम आम्ही करू शकत नाही’ असे सांगण्यात येते.

तर गेल्या दोन वर्षापासून फ क्षेत्रिय कार्यालयाकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. या दफनभूमीमध्ये विषारी सापांचा वावर वाढला आहे. त्यामुळे वाढलेल्या गवतांचा अंदाज न आल्याने भविष्यात येथे येणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. अंत्यविधीसाठी आलेल्या नागरीकांना तेथील गवत काढावे लागतात.

या निमित्ताने आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणा-या महापालिकेचे भयाण वास्तव समोर येत आहे. केवळ एखादी तक्रार आल्यानंतर वरच्यावर गवतांची छाटणी करण्यात येते. सदर गवतांची तेथे वाढलेल्या अनावश्यक झाडांची छाटणी ही योग्य पद्धतीने, मुळापासून न केल्याने पुन्हा काही दिवसांनी त्यांची मोठ्या प्रमाणात वाढ होते.

एखादी जीवितहानी झाल्याशिवाय मनपा प्रशासन, फ क्षेत्रिय कार्यालय व आरोग्य विभागाला जाग येणार नाही का? असा सवाल उपस्थित होत आहे. तरी या तक्रारीची तात्काळ दखल घेऊन सदरील दफनभूमी मधील वाढलेल्या गवतांची,झाडांची लवकरात-लवकर छाटणी करण्यात यावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली ( Nigdi ) आहे.

https://www.youtube.com/shorts/L39U9l-mNBE

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.