Nigdi : ‘कोरोना’ची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री दिवसाआड करा – विजय पाटील 

एमपीसी न्यूज – राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. पुणे, मुंबई आणि नागपूर ह्या प्रमुख शहरांमध्ये कोरोना लागण झालेल्यांची संख्या लक्षणीय वाढलेली आहे. देशात लॉकडाऊन सुरू असून शहरातील काही रहिवाशी मात्र बेफिकररीने त्याला हरताळ फासत आहेत. ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे महत्व अजूनही नागरिकांना समजले नाही त्यामुळे नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री दिवसाआड करावी, अशी मागणी प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.

पाटील म्हणाले की, शहरातील अनेक रहिवासी संध्याकाळच्या सुमारास चौकाचौकामध्ये मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करताना दिसून येत आहेत. कोरोना आजाराबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असतांनाही काहीजण मात्र समाज विघातक असे कृत्य बिनधास्तपणे करीत आहेत. शेकडोंच्या संख्येने बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. बहुतांशी भाजी विक्रेते, किराणा माल विक्रेते,  हे सुद्धा ‘सोशल डिस्टन्सिंग’ चे पालन करताना दिसून येत नाहीत. ही आपल्या शहरासाठी धोक्याची घंटा आहे. अशा वागणुकीमुळे शहरात कोरोना नियंत्रण करणे अवघड ठरू शकते.

जेष्ठ नागरिक आणि मुलांना घराबाहेर पडणासाठी पूर्ण निर्बंध घालावेत. मास्कशिवाय अजिबात घराबाहेर पडू नये, आत्यावश्यक सेवा वगळून दुचाकी व तीनचाकी वाहनांना रस्ता प्रवेश वर्जित करावा, किराणा माल व भाजीपाला दुकाने ही दिवसाआड पद्धतीने उघडावी, पालिका हद्दीत प्रभागवार सम आणि विषम पद्धत आमलात आणावी. विनाकारण फिरणाऱ्यांवर मारहाण न करता दंड- बैठकांचा उपाय अवलंबावा व नोटीस बजावून, पुन्हा विनाकारण रस्त्यावर दिसल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात यावा. प्राधिकरण परिसर हा शैक्षणिक हब असल्याने मोठ्या प्रमाणात विद्यार्थी संख्या आहे. या ठिकाणीही ही युवा मंडळी नियम धाब्यावर बसवीत आहेत. त्यांच्या संकुलप्रमुखांना व सुरक्षाप्रमुखांना या संदर्भात लेखी नोटीस बजवाव्यात. नियम तोडणाऱ्या विक्रेत्यांना परवाना रद्द करण्याबाबत नोटीस बजवावी. मास्क न घालता रस्त्यावर येणाऱ्या व्यक्तींसाठी भरारी पथकाची नियुक्ती करावी व जागेवर आर्थिक दंडात्मक कारवाई करावी. वसूल केलेला दंड पंतप्रधान निधीत जमा करावा, अशी मागणी विजय पाटील यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.