Nigdi: ‘जलशुद्धीकरण केंद्र ते डांगे चौकापर्यंतची जलवाहिनी पूर्ण झाल्यास पाणी समस्या सुटेल’

पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांचा विश्वास

एमपीसी न्यूज – निगडीतील जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्रमांक 23 ते डांगे चौका दरम्यान एक हजार मिली लीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्यात येत आहे. 7.60 किलोमीटर लांबीपैकी आत्तापर्यंत 5.80 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाने आज (गुरुवारी) स्पष्ट केले. तसेच जलवाहिनी टाकण्याचे काम 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण होईल अशी ‘डेडलाईन’ देखील देण्यात आली. पाणीपुरवठा विषयक विकास कामांतर्गत कुठल्याही प्रकारे कामाची अडवणूक झाल्यास याबाबतची माहिती महापालिका वकिलांनी घेऊन याबाबत पोलीस तक्रार दाखल करावी. या कामात विभागातील अधिकाऱ्यांनी फक्त माहिती देणे अपेक्षित असेल, असेही स्पष्ट केले. 

महापालिकेने समन्यायी पाणीपुरवठ्यासाठी 25 नोव्हेंबरपासून एकदिवसाआड पाणीपुरवठा सुरु केला आहे. परंतु, एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरु करुन देखील तक्रारींमध्ये घट झाली नाही. त्याउलट पाण्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या विरोधात नागरिक रस्त्यावर उतरत आहेत. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आज चिंचवड अॅटो क्लस्टर येथे बैठक झाली. महापौर माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. पाणीपुरवठा करताना होणाऱ्या तांत्रिक अडचणींबद्दल विभागाने माहिती दिली.

पिंपरी-चिंचवड शहरात 40 टक्के भागात 24 X 7 पाणीपुरवठा योजनेचे काम सुरु आहे. या कामांतर्गत निगडीतील जलशुद्धीकरण केंद्र सेक्टर क्रमांक 23 ते डांगे चौकपर्यंत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. एक हजार मिलीलीटर व्यासाची जलवाहिनी आहे. 7.60 किलो मीटर लांबीपैकी आत्तापर्यंत 5.80 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. जलशुध्दीकरण केंद्र ते निसर्ग दर्शन, पिंपरी-चिंचवड कॉलेज – रेल्वे क्रॉसिंग – पेठ क्रमांक 29 येथील पाण्याची उंच टाकी – पेठ क्र. 29 येथील आंबेडकर चौक – वाल्हेकरवाडी कल्व्हर्ट – पेट्रोल पंप – वाल्हेकरवाडी शाळा – रानमळा – पवना नदी – नदी क्रॉसिंग – बिर्ला हॉस्पिटल – डांगे चौक असा जलवाहिनीचा मार्ग आहे.

सुमारे 7.60 किलोमीटर जलवाहिनीची लांबी आहे. त्यापैकी आत्तापर्यंत 5.80 किलोमीटर जलवाहिनी टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामामध्ये मुख्यत्वेकरुन पेठ क्रमांक 29 येथील आंबेडकर चौक येथील क्रॉसिंगचे आव्हानात्मक काम आहे. आंबेडकर चौक ते कल्व्हर्ट 700 मीटर, कल्व्हर्ट ते वाल्हेकरवाडी शाळा 400 मीटर, रानमळा -100 मीटर, पवना नदी ते बिर्ला हॉस्पीटल 180 मीटर, हनुमान मंदीर ते डांगे चौक – 200 मीटर या भागात सध्या काम करण्यात येत आहे.

या जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठ्यात सुधारणा होण्यास मदत होईल, असा विश्वास पाणीपुरवठा विभागाने व्यक्त केला आहे. जलवाहिनीचे टाकण्याचे काम 15 फेब्रुवारी 2020 पर्यंत पूर्ण होईल अशी ‘डेडलाईन’ देखील देण्यात आली.

आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समितीचे अध्यक्ष विलास मडेगिरी, सभागृह नेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर, प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, नगरसदस्य संदीप कस्पटे, नगरसदस्य ममता गायकवाड, पाणीपुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, कार्यकारी अभियंता प्रविण लडकत, रामदास तांबे, रवींद्र पवार, दत्तात्रय रामुगडे, संदेश चव्हाण, कंत्राटदाराचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.