Lonavala : डीजे डाॅल्बी वाजविल्यास सक्त कारवाई करणार – शिवथरे

एमपीसी न्यूज- गणेश उत्सव हा पारंपरिक पध्दतीने व कायद्याचे पालन करत साजरा करावा असे आवाहन लोणावळा पोलीस व नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे डाॅल्बी वाजविण्यास बंदी आहे. कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये, उत्सव काळात कोठेही डिजे डाॅल्बी वाजल्यास सक्त कारवाई करणार असल्याचे लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी सांगितले. गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला लोणावळ्यात पोलीस प्रशासनाकडून शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील, वीज वितरणचे अभियंता पवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना शिवथरे म्हणाले, ” प्रत्येक गणेश मंडळांनी कायद्याचे पालन करावे. मंडप उभारणी करताना रहदारीला अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, सर्व शासकिय परवाने घ्यावेत, बाप्पांच्या ठिकाणी पुरेसे स्वंयसेवक, लाईट व्यवस्था व सुरक्षेकरिता सीसीटिव्ही कॅमेरे यांची व्यवस्था करावी. डीजे डाॅल्बीवर बंदी आल्याने ते वाजवू नयेत, अनावश्यक खर्चाला फाटा देत समाजोपयोगी कार्यक्रम हाती घ्यावेत.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मंडळांना स्वच्छतेचा संदेश देणारी थिम घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. तसेच गुलालाचा वापर टाळावा असे आवाहन केले. जाधव म्हणाल्या, “लोणावळा शहर कचराकुंडीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे, प्रत्येक नागरिकाने घरातील कचरा ओला व सुका असे वर्गीकरण करु घंटागाडीत टाकावा. लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने विसर्जन घाटावर हौद बनविण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.