Hinjawadi Crime News : घटस्फोटाच्या वेळी दिलेली शेत जमीन परत मागून पत्नीस मारहाण; पतीला अटक

एमपीसी न्यूज – घटस्फोटच्या वेळी पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी समझोत्याने दिलेली शेत जमीन परत आपल्या नावावर करण्याची मागणी करत पतीने पत्नीला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास मुळशी तालुक्यातील सुसगाव येथे घडली.

संदीप आश्रुबा जाधव (रा. कोलवड, ता. जि. बुलढाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे या प्रकरणी 23 वर्षीय महिलेने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संदीप आणि फिर्यादी महिला हे पती पत्नी आहेत. त्यांचा सन 2016 मध्ये घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाच्या वेळी संदीप याने फिर्यादी यांच्या उदरनिर्वाहासाठी समझोत्याने शेतजमीन दिली आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास संदीप फिर्यादी यांच्या घरी आला.

त्याने दिलेली शेत जमीन परत त्याच्या नावावर कर तसेच लग्नाच्या वेळी दिलेले गिफ्ट परत कर, असे म्हणत तो फिर्यादी यांच्या अंगावर धावून आला. फिर्यादी यांच्या मावशीने संदीपला अडवले. दरम्यान त्याने फिर्यादी यांना दोन तीन चापटा मारल्या व शिवीगाळ केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार बोराडे याप्रकरणी तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.