Pimpri News : ‘फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर’ चाचणीशिवाय रस्त्यावर सिमेंट काँक्रीट, डांबरीकरण करू नका; आयुक्तांचे स्थापत्य विभागाला आदेश

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात दरवर्षी डांबरी तसेच काँक्रीटचे रस्ते तयार केले जातात. सध्यस्थितीत महापालिका कार्यक्षेत्रात 1223.54 किमी लांबीचे डांबरी रस्ते व 97.07 किमी लांबीचे काँक्रीटचे रस्ते आहेत. सध्यस्थितीमध्ये अस्तित्वातील डांबरी रस्त्याचे आयुष्य किती उरले आहे. याचे विश्लेषण करण्यासाठी फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर (FWD) या पध्दतीचा वापर करणे आवश्यक आहे. कमीतकमी 10 वर्ष पूर्ण झालेल्या डांबरी रस्त्यांसाठी याद्वारे चाचणी करण्यात यावी. चाचणी करण्यासाठी येणारा खर्च स्थापत्य विभागाने ठरवून द्यावा, जेणेकरून एकवाक्यता राखता येईल. फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर हि चाचणी केल्याशिवाय रस्ते काँक्रीट करण्याचा निर्णय घेवू नये, तसेच कामांना तांत्रिक मान्यता देताना FWD चाचणीच्या अहवालानुसार येणाऱ्या आच्छादनाच्या थराच्या जाडीची शहानिशा करावी, अशा महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी संबंधित विभाग व स्थापत्य अभियंता यांना दिल्या आहेत.

महापालिकेमार्फत दरवर्षी डांबरी रस्त्यांची देखभाल दुरुस्ती केली जाते. रस्ते तयार करताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडील नियमांचा अभ्यास केला जातो. परंतु, रस्ता बांधत असताना तो डांबरी करावा किंवा काँक्रीटचा करावा, हे ठरविण्याबाबत निश्चित असे निकष नाही.

त्यामुळे महापालिका कार्यक्षेत्रातील काँक्रीट व डांबरी रस्ते तयार करण्यासाठी धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. रस्ते डांबरी किंवा काँक्रीटचा करणेबाबतचा निर्णय बहुतेक वेळा महापालिकेच्या उपलब्ध आर्थिक तरतुदीवर अवलंबून असतो. आर्थिक धोरणाशी सदरची बाब संबंधित असल्याने याची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे.

त्यात म्हटले आहे की, राज्य / राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे केंद्र सरकारच्या निधीने बांधण्यात येणार असेल तर असे रस्ते प्रामुख्याने काँक्रीटचे करण्यात येतात. तसेच, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत HAM पद्धतीने केल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या कामामध्ये डांबरी रस्ते करण्यास प्राधान्य दिले जाते. गावठाण परिसरात जेथे गर्दी, रहदारी इत्यादींमुळे वारंवार रस्ते बांधकाम करणे शक्य होत नाही, अशा ठिकाणी काँक्रीट रस्त्यांना प्राधान्य दिले जाते.

महापालिका क्षेत्रात रस्ते करत असताना कोणते रस्ते डांबरी व कोणते रस्ते काँक्रीटचे करावेत, याविषयी अस्तित्वातील रस्त्यांच्या तांत्रिक बाबींचा विचार करून काही मार्गदर्शक तत्त्वे अवलंबविणे गरजेचे आहे. याचे कारण काँक्रीटचे रस्ते तयार करण्यासाठी साधारणपणे डांबरी रस्त्यापेक्षा 30 टक्के इतका अधिक खर्च येतो तसेच काँक्रीट रस्ता तयार केल्यानंतर त्या रस्त्यावर खोदाई करणे त्रासदायक व खर्चिक असते. त्यामुळे फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर द्वारे चाचणी करून निर्णय घेणे महत्वाचे ठरणार असून IRC – 115-2014 चे मानांकनानुसार चाचणी मान्यताप्राप्त अतिशय चांगली व विश्वसनीय आहे.

डांबरी रस्त्यावर सदरची चाचणी केल्यावर त्याचे आयुष्य किती उरले आहे तसेच रस्ता पूर्ववत करण्यासाठी किती जाडीचा डांबरी थर टाकावा लागेल हे समजू शकते. जर रस्त्याचे उर्वरित आयुष्य कमीत कमी 60 टक्के असेल. तर, डांबरीकरणाचे आच्छादन करून कमी खर्चामध्ये सध्यस्थितीतील रस्त्याचे आयुष्य पुन्हा वाढू शकेल. तसेच, मोठ्या प्रमाणात अंदाजपत्रकीय खर्च वाचू शकेल.

परंतु, रस्त्याची चाचणी केल्यानंतर डांबरी रस्त्याचे उर्वरित आयुष्य 15 टक्के पेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आल्यास, डांबरीकरणाच्या आच्छादनासाठी येणारा खर्च व नव्याने करावयाचा काँक्रीटीकरणाचा खर्च यांची तुलना करून रस्ता संपूर्णपणे काँक्रीट करण्याविषयीचा निर्णय घेता येईल. बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या फॉलिंग वेट डिफ्लेक्टोमीटर (FWD) चाचणीच्या मशिनरीची यादी व अशा पद्धतीने चाचणी करून सल्ला देणाऱ्या सल्लागारांची नावे स्थापत्य विभागाने वेळोवेळी प्रसिद्ध करावी, असेही आयुक्त पाटील यांनी नमूद केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.