PCMC: शहरवासीयांनो, प्रारूप विकास योजनेसाठी मत नोंदवा; महापालिकेचे आवाहन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या नगररचना (PCMC) आणि मूल्य निर्धारण विभागाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सुधारित प्रारूप विकास योजना तयार करण्याचे कामकाज सुरु आहे. नागरिकांनी शहरातील आवश्यक सेवा सुविधा प्रस्तावित करण्यासाठी विविध माध्यमातून आपले मत विकास योजना कार्यालयास कळवावे, असे आवाहन विकास योजना, विशेष घटक, पिंपरी-चिंचवड महापालिका व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण घटकाचे नगररचना उपसंचालक विजय शेंडे यांनी केले आहे.

शहरात नव्याने करावयाची विकास कामे, आरक्षणे, नियोजित प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रारूप विकास योजना तयार करण्याचे काम महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमाद्वारे करण्यात येते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विद्यमान जमीन वापराबाबत नकाशा तयार करण्यात आला असून नकाशा महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केला आहे. प्रारूप विकास योजना सुधारित करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात असून अंतिम विकास योजना प्रसिद्ध करण्याच्या दृष्टीकोनातून प्रारूप विकास योजनेचे महापालिकेला लवकरच हस्तांतरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक सेवा सुविधा प्रस्तावित करण्यासाठी तसेच शहरातील नागरिकांचे मत किंवा कल जाणून घेण्यासाठी सूचना करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

Pimpri Crime : वरिष्ठांच्या सांगण्यानुसार वाग; अन्यथा खोट्या गुन्ह्यात अडकवू म्हणत महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग

दरम्यान, प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने विविध (PCMC) शासकीय विभाग, भागधारक संस्था तसेच महापालिकेच्या विविध विभागांनी भविष्यात लागणाऱ्या सेवा सुविधांच्या जागांची मागणी नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाकडे सादर केली आहे. विकास योजना तयार करण्याच्या प्रक्रियेत नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. त्यांच्या आशा आकांक्षांचे प्रतिबिंब प्रारूप विकास योजनेत दिसावे. तसेच, विकास आराखडा लोकाभिमुख व दोषविरहित होण्यास मदत व्हावी यासाठी नागरिकांनी त्यांचे मत कळवावे असे आवाहन शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभाग तसेच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना करण्यात येत आहे.

नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रारूप विकास योजनेच्या अनुषंगाने आवश्यक सेवा सुविधांबाबत मत व सूचना [email protected] या विकास योजना कार्यालयाच्या मेल आयडीवर अथवा उपसंचालक, नगर रचना, विकास योजना विशेष घटक, पिंपरी चिंचवड महापालिका व पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय, पिंपरी-पुणे तसेच संत तुकारामनगर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, मार्केट इमारत, तिसरा मजला, पिंपरी या पत्त्यावर पाठवावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.