PCMC News : सात दिवस उलटूनही स्मिता झगडे ‘चार्ज’पासून वेटिंगवर

एमपीसी न्यूज : पिंपरीचिंचवड महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांची बदली होऊन आणि त्यांच्या जागी महापालिकेच्या उपायुक्त स्मिता झगडे यांची (PCMC News) अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती होऊन आज बरोबर सात दिवस उलटले. पण, अद्यापही ढाकणे यांना कार्यमुक्त केले नाही आणि झगडे यांनाही रुजू करून घेतले नाही. त्यामुळे महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

भारतीय रेल्वे सुरक्षा सेवेतील (IRPFS)  विकास ढाकणे यांची 13 सप्टेंबर रोजी राज्य शासनाने महापालिका अतिरिक्त आयुक्तपदावरील प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली. त्यांच्या सेवा त्यांच्या मूळ प्रशासकीय विभागाकडे प्रत्यार्पित केल्या. त्यांच्याजागी महापालिकेतच सहाय्यक आयुक्त म्हणून काम केलेल्या आणि आता  उपायुक्त असलेल्या स्मिता झगडे यांची नियुक्ती झाली. त्यानुसार झगडे बुधवारी (दि.14) सकाळी दहा वाजताच अतिरिक्त आयुक्तपदाचा पदभार स्वीकारण्यासाठी महापालिका मुख्यालयात आल्या. पण, त्यादिवशी आयुक्त शेखर सिंह दिवसभर महापालिकेत आले नव्हते. त्यामुळे झगडे यांनी टपालाने रुजू अहवाल आयुक्त कार्यालयाकडे पाठविला. पण, आयुक्तांनी रुजू अहवालावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे झगडे यांना पदभार स्वीकारता आला नाही.

Supriya sule : पदाने मोठे असून चालत नाही दिलदार आणि कर्तत्वान देखील असले पाहिजे – सुप्रिया सुळे

त्यानंतर शुक्रवारी पुन्हा झगडे यांनी आयुक्तांकडे धाव घेतली. पण, सोमवारी बघू म्हणून आयुक्तांनी त्यांना परत पाठविले. त्यानंतर सोमवारी सकाळी दहा वाजताच झगडे महापालिकेत दाखल झाल्या.(PCMC News) पण, सोमवारी दिवसभर थांबूनही झगडे यांना रुजू करून घेतले नाही. त्यामुळे प्रशासकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. झगडे यांच्या नियुक्तीवरून राजकीय नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याचे बोलले जाते. तर, दुसरीकडे झगडे यांची सेवा कमी असून त्या आम्हाला ज्युनिअर आहेत. आम्ही त्यांच्या हाताखाली कसे काम करायचे असे पालिकेतील मुख्याधिकारी (सीओ) केडरचे आणि महसूलचे अधिकारी खासगीत बोलत आहेत.

तर, बदली झालेल्या दुसऱ्या दिवसापासून विकास ढाकणे महापालिकेत फिरकले नाहीत.  महापालिका प्रशासनाने ढाकणे यांना अद्याप कार्यमुक्त केले नाही. त्यामुळे अतिरिक्त आयुक्तपदी ढाकणेच राहणार, झगडे पदभार स्वीकारणार की नवीनच अतिरिक्त आयुक्त येणार याकडे महापालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष्य लागले आहे.(PCMC News) याबाबत आयुक्त शेखर सिंह यांना विचारले असता ते म्हणाले, “स्मिता झगडे या महापालिकेतच कार्यरत होत्या. त्या काही गोंदियावरून आल्या नाहीत. प्रशासकीय प्रक्रिया असते. त्यामुळे विलंब होत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.