Pimpri News : रमाई भीमराव आंबेडकर यांच्या कार्यास साजेसे स्मारक महापालिका उभारणार; महापौरांची माहिती

एमपीसी न्यूज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांचे कार्य महान आहे. त्यांच्या कार्यास साजेसे रचनात्मक तसेच दर्जेदार स्मारक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वतंत्र जागेवर उभारण्यात येईल असा निर्णय महापौर उषा ढोरे यांनी आज (शुक्रवारी) जाहीर केला.

पिंपरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयामागील मोकळ्या जागेत त्यागमूर्ती माता रमाई यांचे उचित स्मारक उभारण्यात येणार आहे. नियोजित स्मारकासाठी स्वतंत्र जागा मिळावी अशी मागणी विविध संघटनांनी महापालिकेकडे केली होती. या नियोजित स्मारकाची माहिती तसेच आढावा घेण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तसेच भारतीय बौद्ध महासंघाचे कार्याध्यक्ष भीमराव यशवंत आंबेडकर महानगरपालिकेत आले होते.

त्यांच्यासमवेत नुकतीच महापालिका भवनामध्ये बैठक संपन्न झाली. या बैठकीत भीमराव आंबेडकर यांनीदेखील स्वतंत्र स्मारक उभारण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. या सर्व बाबींवर विचार विनिमय करुन तसेच जनसामान्यांच्या भावना लक्षात घेता त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे स्मारक स्वतंत्र जागेत उभारण्याचा निर्णय महापौर ढोरे यांनी घेतला आहे.

भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधानाच्या माध्यमातून केलेले महान कार्य भारतीय नागरिकांसाठी महत्वपूर्ण आहे. उपेक्षित घटकांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लढा उभारुन त्यांना न्याय मिळवून दिला. त्यांना त्यांच्या कार्यासाठी पुरेसा वेळ मिळावा याकरिता त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांनी भक्कमपणे साथ दिली. बाबासाहेबांना सदैव साथ देणा-या माता रमाई यांचे कार्यदेखील स्वतंत्रपणे अधोरेखित करण्यासारखे आहे. त्यांच्या त्यागाचे स्मरण आजही कोट्यावधी जनता करीत आहे.

त्यामुळे जनभावनेचा आदर राखत त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न स्मारकाच्या माध्यमातून महानगरपालिका करणार आहे. या स्मारकामध्ये माता रमाई यांचा पुर्णाकृती पुतळा तसेच म्युरल्स् आणि बहुउद्देशीय उपक्रम राबविण्याचा महापालिकेचा मानस आहे. यासाठी लागणारा वाढीव निधी देखील उपलब्ध करुन देण्यात येईल असे महापौर ढोरे यांनी सांगितले.

महापालिकेने शहरामध्ये शिवसृष्टी, भीमसृष्टी शाहूसृष्टी आणि फुलेसृष्टीच्या माध्यमातून थोर महापुरुषांचे कार्य लोकांसमोर स्मारकाच्या माध्यमातून मांडले आहे. हा उपक्रम प्रेरणादायी ठरत असून त्याचधर्तीवर त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहितीही महापौर ढोरे यांनी यावेळी दिली.

यावेळी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, क्रीडा कला साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती उत्तम केंदळे, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसदस्य संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, नगरसदस्या सीमा सावळे, आशा धायगुडे शेडगे, सुलक्षणा शिलवंत धर, माजी नगरसदस्य शांताराम भालेकर आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.