Pimpri News : बैलगाडा घाटांच्या दुरुस्तीसाठी बजेटमध्ये निधीची तरतूद करा, महापौरांची प्रशासनाला सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरामधील समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाट अस्तित्वात आहेत. आता परवानगी मिळाल्यानंतर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल. परंतु, गेली 11 वर्षे या बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे घाटांची दुरावस्था झाली आहे. येणा-या बजेट मध्ये बैलगाडा घाटाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशी सूचना महापौर उषा ढोरे यांनी महापालिका प्रशासनास दिली.

संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा पारंपारिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत आहे. या स्पर्धेवर गेली 11 वर्षापासून बंदी आली होती. परंतु, 16 डिसेंबर 2021 रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्पर्धेला सशर्त परवानगी मिळाली आहे. या बैलगाडा शर्यती म्हणजे ग्रामीण भागातील शेतक-यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा व पारंपारिक असा धार्मिक खेळ आहे. या स्पर्धावरती ग्रामीण भागातील अर्थकारण मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे.

त्याचप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरामधील प्रत्येक गावामध्ये विशेष करून समाविष्ट गावांमध्ये बैलगाडा शर्यती आयोजित करण्यासाठी पूर्वीपासून बैलगाडा घाट अस्तित्वात आहेत आणि आता परवानगी मिळाल्यानंतर या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल, परंतु गेली 11 वर्ष या बैलगाडा शर्यती बंद असल्यामुळे सदरील बैलगाडा घाटांची दुरावस्था झालेली आहे. घाट हे स्पर्धा घेण्यायोग्य राहिलेले नाहीत. प्रत्येक गावामधील घाटाची डागडुजी दुरुस्ती आपल्याकडील उपलब्ध निधीमधून करावी तसेच येणा-या बजेट मध्ये बैलगाडा घाटाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात यावी अशा सूचना महापौर ढोरे यांनी महापालिका प्रशासनास दिल्या.

यावेळी पक्षनेते नामदेव ढाके, माजी महापौर राहुल जाधव, शिक्षण समिती सभापती माधवी राजापुरे, क्रिडा समिती सभापती प्रा.उत्तम केंदळे, प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, सागर आंगोळकर, नगरसदस्य संतोष लोंढे, राजेंद्र गावडे, नगरसदस्या सिमा सावळे, आशा शेंडगे, सुलक्षणा धर, माजी नगरसदस्य शांताराम भालेकर, वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य आनंदा यादव, बैलगाडा मालक अजित बुर्डे, चेतन जाधव, अतुल बोराटे, राहुल सस्ते, निखिल बो-हाडे, तुषार सस्ते, गोटया भाऊ फुले, विनायक मोरे आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.