Pimple nilakh: क्रिकेट, फुटबॉल मैदान उखडलेल्या प्रकरणाची चौकशी – आयुक्त हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपळे-निलख येथे खेळाची आवड जोपासण्यासाठी खासगी जागेत तयार केलेल्या क्रिकेट आणि फुटबॉल मैदानातील नेट, खांब महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने कोणतीही नोटीस अथवा पूर्वसूचना न देता अक्षरश: उखडून, पाडून टाकलेल्या प्रकरणाची आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. जे चांगले आहे, ते तोडणे आवश्यक नव्हते. त्याची चौकशी सुरु असून चौकशीअंती जबाबदार असणा-यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पिंपळे-निलख येथील हेमंत साठे यांचा सर्व्हे क्रमांक 64 येथे स्वमालकीचा भूखंड आहे. केंद्र सरकारच्या खेलो इंडिया या उपक्रमास प्रोत्साहन म्हणून तसेच कुटुंबाला असणारी खेळाची आवड जोपासण्याकरिता साठे यांनी आपल्या खासगी जागेत खेळाचे मैदान विकसित केले होते. हिरवळ लावून मैदान करण्यात आले आहे. विजेचे खांब उभे करून नेट लावून क्रिकेट आणि फुटबॉल कोचिंग अ‍ॅकॅडमी सुरू करण्यात आली आहे. या मैदानात दररोज नवोदित खेळाडू खेळाचे प्रशिक्षण घेत असतात. मात्र, 29 डिसेंबर 2018 रोजी दुपारी महापालिकेचे बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता अनिल राऊत हे इतर अधिका-यांसमवेत मैदानात आले.

त्यांच्यासमवेत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पोलीस कर्मचारीही होते. राऊत यांनी सहशहर अभियंता राजन पाटील यांच्या आदेशानुसार कारवाई करत असल्याचे तोंडी सांगितले आणि काहीही ऐकून न घेता मैदानातील क्रिकेट आणि फुटबॉलसाठी लावलेले नेट तसेच विजेचे खांब उखडून टाकले. एवढ्यावरच न थांबता साठे यांच्या मालमत्तेच्या सीमाभिंतीचा काही भागही पाडला. या अन्यायकारक कारवाईबाबत साठे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पत्र देऊन या प्रकरणाची सक्षम अधिका-यामार्फत चौकशी करावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत चुकीच्या कारवाईसाठी जबाबदार असलेल्या संबंधित अधिका-यांवर निलंबनाची कारवाई करावी. तसेच या चुकीच्या कारवाईमुळे आमच्या झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी केली होती.

याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना विचारले असता ते म्हणाले, ”खासगी जागेत असलेल्या मैदानाचा खेळाडू उपयोग करत होते. हे चांगले होते. त्यामुळे जे चांगले आहे, ते तोडणे आवश्यक नव्हते. त्याची चौकशी सुरु असून चौकशीअंती जबाबदार असणा-यांवर कारवाई केली जाईल”. दरम्यान, चिंचवड, संभाजीनगर येथील बस टर्मिनलच्या आरक्षित जागेवरची सीमाभिंत तोडलेल्या प्रकरणाची देखील चौकशी सुरु आहे. संबंधित अधिका-यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. तसेच जी झाडे तोडली ती उद्यान विभागाची परवानगी घेऊनच तोडली आहेत. केवळ फूड फेस्टिवलसाठी झाडे तोडल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल”, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.