Pimpri: गोड बातमी, 10 संशयितांचे रिपोर्ट ‘निगेटिव्ह’!

एमपीसी न्यूज – कोरोनाचे संशयित म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरीतील नवीन रुग्णालयात दाखल झालेल्या 10 संशयितांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर, कोरोना बाधित असलेल्या 12 जणांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, मागील पाच दिवसांपासून शहरात कोरोनाचा एकही ‘पॉझिटिव्ह’ रुग्ण आढळला नाही.  शहरवासीयांसाठी ही दिलासायदक बाब आहे.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय व नविन भोसरी रुग्णालयामधून आजपर्यंत 134 व्यक्तींचे कोरोनाकरीता घश्यातील द्रव्यांचे नमुने ‘एनआयव्ही’कडे तपासणीसाठी पाठविण्यात आले.  मंगळवारी पाठविलेल्या 10 जणांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर, आज तीन संशयितांना महापालिका रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या घश्यातील द्रव्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.

शहरात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 12 आहे. सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर महापालिका रुग्णालयाच्या ‘आयसोलेशन’ कक्षामध्ये उपचार सुरु आहेत. 12 मार्च रोजी पॉझिटिव्ह आढळलेल्या तीन रुग्णांचे 14 दिवस पुर्ण झाले आहेत. या रुग्णांच्या घश्यातील द्रवाचे नमुने आज पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. त्यांचा रिपोर्ट उद्या येणे अपेक्षित आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.