Pimpri : रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा मुबलक; नवीन रक्तदान शिबिरांचे आयोजन मे महिन्यात करण्याची गरज

पिंपरी चिंचवड शहरातील रक्तपेढ्यांची माहिती

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा मुबलक प्रमाणात आहे. बहुतांश शस्त्रक्रिया कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रक्ताची मागणी अतिशय घटली आहे. सध्या उपलब्ध असलेला रक्तासाठा पुढील तीन आठवडे पुरेल एवढा आहे. त्यामुळे सध्या आयोजित होणारी रक्तदान शिबीरे पुढे ढकलावीत; अथवा इच्छुक रक्तदात्यांची यादी तयार करावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड शहरातील विविध रक्तपेढ्यांकडून करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड ब्लड बँकेचे संचालक युवराज बडगुजर यांनी सांगितले की, “शहरात सगळीकडे सध्या रक्ताचा स्टॉक मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. सध्या अतिशय क्रिटिकल केसेस आणि थॅलेसिमियाच्या रुग्णांना रक्ताची गरज आहे. पूर्वी दररोज 25 ते 30 पिशव्यांची मागणी असायची. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बहुतांश रुग्णालयातील सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ही मागणी दररोज 3 ते 4 पिशव्यांवर आली आहे. त्यात थॅलेसिमियाच्या रुग्णांना जेवढे फ्रेश रक्त मिळेल तेवढे त्यांच्या तब्बेतीसाठी उत्तम असते. त्यासाठी जे इच्छुक रक्तदाते आहेत, त्यांची एक यादी बनवून संबंधित रक्तपेढीला द्यावी. जेंव्हा आवश्यक असेल तेंव्हा रक्तपेढीकडून संपर्क साधून रक्ताची गरज भागवली जाईल.”

मोरया ब्लड बँकेचे संचालक राजेंद्रकुमार देसाई यांनी पुढील तीन आठवडे पुरेल एवढे रक्त उपलब्ध असून सध्या रक्ताची आवश्यकता नसल्याचे सांगितले. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात रक्ताची गरज मोठ्या प्रमाणात भासेल, तेंव्हा रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असेही ते म्हणाले.

पीएसआय ब्लड बँकेचे सिनियर टेक्निशियन संतोष कांबळे यांनी देखील रक्ताचा स्टॉक मुबलक आणि मागणी अतिशय कमी असल्याचे सांगितले. शरीरातून रक्त काढून घेतल्यानंतर ते 35 दिवस वापरण्यायोग्य राहते. सध्या ट्रॉमा, अपघात, डिलिव्हरी यांच्यासाठी रक्ताची गरज आहे. ही गरज भागविण्यासाठी सध्या मुबलक प्रमाणात रक्तासाठा आहे. सर्व शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या असल्यामुळे शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर रक्ताची मोठ्या प्रमाणात मागणी वाढेल. तेंव्हा रक्तदान करण्याची खूप गरज आहे.”

पिंपरी चिंचवड ब्लड डोनर असोसिएशनचे अध्यक्ष राजू शिवतरे म्हणाले यांनी सांगितले की, “आता सर्व रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अथवा मे महिन्याच्या सुरुवातीला सर्व रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर रक्ताची आवश्यकता लागेल. तेंव्हा संबंधित यंत्रणांकडून आवाहन केले जाईल. त्यावेळी रक्तदात्यांनी पुढे येऊन रक्तदान करावे. आता जी शिबिरे सुरू आहेत, ती सुरू ठेवावीत. नवीन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे योग्य नाही. त्यात सध्या रक्तपेढ्यांकडे रक्त जमा करण्याच्या पिशव्या आणि इतर साहित्य देखील उपलब्ध नाही. त्यामुळे रक्तदात्यांची यादी करून रक्तपेढ्यांकडे दिल्यास त्यांना जशी आवश्यकता भासेल तसे पेढ्या रक्तदात्यांना आवाहन करून गरज भागवतील.”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.