Pimpri : वांद्रे गर्दी प्रकरणाची सखोल चौकशी करा – अमित बच्छाव 

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र शासन जनसामान्यांसाठी दिवसरात्र काम करत आहे, लोकांना ते दिसत आहे. बहुसंख्य जनता महाविकास आघाडीच्या सरकारवर आणि त्यांच्या एकूणच कामावर समाधानी आहे, परंतु काही जण सरकारला अडचणीत आणण्याचे प्रयत्न करीत आहेत. मुंबईतील वांद्रे गर्दी प्रकरणही त्याचाच भाग आहे. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पिंपरी-चिंचवड  शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.

याबाबत बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडीने नेहमीच महाराष्ट्र विकासाला प्रथम प्राधान्य दिले आहे. सत्तास्थापन होऊन काही महिने उलटले. कोरोनासारख्या आजाराने देशासह महाराष्ट्रात थैमान घातले. परंतु महाविकास आघाडी सरकार संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात ठेवून जनतेच्या विश्वासास पात्र ठरत आहे. त्यामुळे सरकारला बदनाम करण्यासाठी अनेक षडयंत्रे रचली जात आहेत. मुंबईतील वांद्रे स्टेशनबाहेर जमवला गेलेला जमाव हा ही एक सुनियोजीत कटाचाच भाग असल्याच शक्यता अधिक वाटत आहे.

वांद्रे स्टेशन हे काही लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या सुटण्याचे स्थान नाही. जर स्वयंस्फूर्तीने जमाव जमलाच असता तर सीएसटी, दादर किंवा लोकमान्य टिळक टर्मिनस येथे जमायला हवा होता. परंतु, तो वांद्रे येथेच का जमवला गेला, याचे उत्तर शोधायला हवे. हा जमाव जमवण्यामागे कुणाचे अदृश्य हात आहेत, याचेही उत्तर मिळायलाच हवे. सरकारच्या प्रयत्नांना डाग लागेल असा हेतू बाळगून जनतेमधे अफवा पसरवणारे कोण आहेत, याचा छडा लावायलाच हवा. तसेच क्षणिक राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्राशी गद्दारी करणार्‍यांचा बुरखा टराटरा फाडायची वेळ आज येवून ठेपलीय. त्यामुळे या प्रकरणाचा कर्ता-करविता कोण आहे, याची सखोल चौकशी करून सत्य जनते समोर आणले गेले पाहिजे, असे अमित बच्छाव यांनी म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.