Pimpri: आता उपसूचना स्वीकारल्यास कारवाई अटळ; भाजप प्रदेशाध्यक्षांचा इशारा

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत एकही उपसूचना घ्यायची नाही असा आदेश असतानाही मागील सभेत भाजपने उपसूचना स्वीकारल्यानंतर आता उसपचूना स्वीकारल्यास पक्षाची वतीने कारवाई निश्चित केली जाईल, असा इशारा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी  दिला आहे. त्यामुळे महापालिकेत सत्तेत आल्यापासून उपसूचनांचा पाऊस पाडणारे सत्ताधारी प्रदेशाध्यक्षांच्या दुस-या आदेशानंतरही 20 मार्चच्या महासभेत आणि अर्थसंकल्पाच्या सभेत उपसूचना देतात का, हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.

अनेक उपसूचना विषयाला सुसंगत नसत. कोणत्याही विषयाला कोणतीही उपसूचना दिली जात होती. केवळ चार ते पाच पदाधिकारी ठरवून उपसूचना घेत असत. स्वपक्षीय नगरसेवकांना देखील उपसूचना माहिती होत नसत. त्यामुळे स्वपक्षीय तक्रारी, नाराजी व्यक्त करु लागले. विरोधक आरोप करु लागले. स्वपक्षीयांची नाराजी आणि विरोधकांचे आरोप दोन वर्षावर आलेल्या निवडणुकीला मारक ठरु शकतात. त्यामुळे महापालिकेतील पदाधिका-यांचे कान टोचत उपसूचना घ्यायची नाही आणि द्यायची नाही असा आदेश  प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी जानेवारीमध्ये दिला होता.

महापालिकेतील पदाधिका-यांनी चक्क प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आदेशालाच कोलदांडा दाखवत फेब्रुवारीच्या महासभेत गोंधळाचा फायदा घेत तब्बल पाच विषयांच्या उपसूना घुसडल्या. त्यातील काही उपसूचना आर्थिक असून त्याचे वाचन देखील केले नाही. तसेच गोंधळात सभेचे कामकाज उरकत अवघ्या तीन मिनिटात 18 विषय मंजूर केल्याने भाजपवर टीका झाली होती.

त्यापार्श्वभुमीवर शहरात आले असताना पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, महासभेत उपसूचना घ्यायचा नाहीत असा निर्णय पक्षाने घेतला आहे. बैठकीस सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत. त्यांनी पक्षाच्या सूचनेचे पालन गांभिर्याने करावे. कोणत्याही उपसूचना घेऊ नये, अन्यथा पक्षाच्या वतीने कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.