Pimpri: भाजपचे अमित गोरखे, भीमा बोबडे, आरपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे यांची माघार

एमपीसी न्यूज – पिंपरी विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केलेले अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, भाजप प्रदेश कार्यकारिणी समितीचे सदस्य अमित गोरखे यांनी तलवार म्यान केली आहे. भाजपचे माजी नगरसेवक भीमा बोबडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील माघार घेतली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज आज (सोमवारी) मागे घेतला आहे.

यावेळी महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार, खासदार श्रीरंग बारणे, पीसीएनडीटीएचे अध्यक्ष सदाशिव खाडे उपस्थित होते.

शिवसेना-भाजप-आरपीआयची महायुती झाली. महायुतीत पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला सुटला आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार गौतम चाबुकस्वार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवसेनेला मतदारसंघ सुटल्याने भाजपचे अमित गोरखे यांनी बडखोरी केली होती. त्यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तसेच माजी नगरसेवक भीमा बोबडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी देखील अर्ज दाखल केला होता.

तिघांचेही मन वळविण्यात महायुतीच्या नेत्यांना यश आले आहे. अर्ज माघार घेण्याची मुदतीत त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सकाळी बैठक झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांच्याशी फोनवर बोलणे झाले. नेत्यांच्या विनंतीनुसार अर्ज मागे घेतल्याचे गोरखे यांनी माघारीनंतर सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.