Pimpri : लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविणे बिल्डरांना बंधनकारक करा, महापौरांचा आदेश 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील लेबर कॅम्पमधील नागरिकांची, त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे, असा आदेश महापौर राहुल जाधव यांनी प्रशासनाला दिला. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची जुलै महिन्याची सर्वसाधारण तहकूब सभा आज (गुरुवारी) आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते.  पिंपळेगुरव येथील एका बांधकाम साईटवर असलेल्या लेबर कॅम्पमधून अडीच वर्षाच्या मुलीचे मंगळवारी (दि. 23) मध्यरात्री अपहरण केले होते. चिमुरडीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार करत  तिचा निर्घृण खून केला. आज झालेल्या महासभेत त्याचे पडसाद उमटले. सर्वपक्षीय नगरसेविकांनी मुली, महिलांच्या सुरक्षिततेकडे सभागृहाचे लक्ष्य वेधले.

माजी महापौर मंगला कदम म्हणाल्या, शहरात अत्याचार, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. छेडछाड, सोनसाखळी चोरीच्या घटना मोठ्या संख्येने घडत आहेत.  मुली, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दोन वर्षाच्या चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावी. शहरात अनेक ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविले नाहीत. जिथे कॅमेरे नसतील, तिथे तातडीने ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. त्यामुळे आरोपी शोधण्यास मदत होईल. फुटेज पोलिसांना देण्यात यावे, अशी मागणीही कदम यांनी केली.

भाजपच्या झामाबाई बारणे म्हणाल्या, बलात्कार, विनयभंगाच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशा घटना घडू नयेत यासाठी उपाययोजना कराव्यात. ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. माई ढोरे म्हणाल्या, महापालिका इमारतीच्या पाठीमागे खून होत आहे. बलात्कार, विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीतल काटे म्हणाल्या, स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित होत असलेल्या पिंपळेगुरवमध्ये मुली, महिला सुरक्षित नाहीत. पिंपरी-चिंचवड शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरात सर्वत्र ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावेत. पोलिसांवर वचक निर्माण करा. कायदा-सुव्यवस्थेबाबत पोलिसांशी बैठक घेण्यात यावी. शिवसेनेच्या मीनल यादव म्हणाल्या, मुली, महिलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले, दोन वर्षाच्या चिमुरडीवर झालेली बलात्काराची घटना अत्यंत दुर्देवी आहे. विकृती संपविणे गरजेचे आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे. स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात येत आहेत. उर्वरित ठिकाणी देखील कॅमेरे बसविण्यात यावेत.

महापौर राहुल जाधव म्हणाले, शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याबाबत लवकरच पोलीस आयुक्तांशी चर्चा केली जाईल. त्यांच्यासोबत तातडीने बैठक घेतली जाईल. शहरात ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. त्यानुसार शहरात सर्वत्र कॅमेरे बसविले जातील. तसेच लेबर कॅम्पवरील नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी लेबर कॅम्पमध्ये ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात यावे. त्यांना तसे बंधनकारक करण्यात यावे, असा आदेश महापौर जाधव यांनी प्रशासनाला दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.