Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी घेतले सायबर क्राईम टाळण्याचे धडे

महाराष्ट्र सायबर, क्विक हील फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड सायबर सेल यांच्या वतीने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सायबर, क्विक हिल फाउंडेशन आणि पिंपरी-चिंचवड सायबर सेल यांच्यावतीने सायबर गुन्हेगारी याबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे प्रशिक्षण शिबिर कॉलेज ऑफ बिझनेस स्टडीज अँड कॉम्पुटर अॅपलिकेशन्स चिंचवड येथे बुधवारी (दि. 24) घेण्यात आले. प्रशिक्षण शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायबर गुन्हेगारीचा विस्तार आणि त्यापासून वाचण्यासाठी घ्यावयाची काळजी, याबाबत चे धडे घेतले.

प्रशिक्षण दोन सत्रांमध्ये घेण्यात आले. पहिल्या सत्रात पिंपरी-चिंचवड सायबर सेलचे पोलिस अधिकारी नीलेश बोडके व भास्कर भारती यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये सायबर स्पेसमध्ये सुरक्षित राहण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी आणि सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे, असे सांगण्यात आले. तर दुसऱ्या सत्रात क्विक हील फाउंडेशनने मालवेअरचे प्रकार सोशल मीडिया थ्रोट्स इंटरनेट एडिक्शन याबाबत माहिती दिली. तसेच शाळा व महाविद्यालयांमध्ये सायबर सुरक्षेसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करावे, असेही सांगण्यात आले.

  • यावेळी भास्कर भारती म्हणाले, ओएलएक्स या सोशल साईटवरून गाडी खरेदी करताना योग्य काळजी घ्यावी. आर्मीमध्ये नोकरीस असल्याचे भासवून तसेच आर्मीचे खोटे कॅन्टीन कार्ड पाठवून ग्राहकांचा विश्वास संपादन केला जातो तसेच ग्राहकांना ऑनलाइन माध्यमातून पैसे पाठवण्यास सांगितले जातात. सैनिक गाडी विकत असल्याने सर्वसामान्य ग्राहक इतर कोणतीही चौकशी न करता पैसे पाठवतात. परंतु अज्ञात आरोपी त्यांची फसवणूक करतात त्यामुळे नागरिकांनी प्रत्यक्ष जाऊन गाडीत बघितल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये.

ऑनलाइन जॉब संदर्भात देखील योग्य ती खात्री झाल्याशिवाय कोणताही आर्थिक व्यवहार करू नये. त्याचप्रमाणे एटीएम कार्ड लोन संदर्भात नागरिकांनी एटीएम मशीनमधून पैसे काढण्यापूर्वी एटीएम मशीनला स्किमर अथवा तत्सम एखादी संशयित वस्तू व छुपा कॅमेरा बसवला नसल्याची खात्री करावी. संशयित वस्तू निदर्शनास आल्यास सायबर सेलशी तात्काळ संपर्क करावा, असेही भारती यांनी सांगितले.

  • पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीधर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.