Chinchwad : फसवणुकीतून मिळालेले कोट्यावधी रुपये क्रिप्टोकरन्सीद्वारे हॉंगकॉंगला

पिंपरी-चिंचवड सायबर सेलने ठोकल्या पाच जणांना बेड्या

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सायबर सेलने फसवणुकीचा (Chinchwad)  एक प्रकार उघडकीस आणून पाच जणांना अटक केली आहे. हॉंगकॉंग मधून फसवणुकीचे रॅकेट चालवणाऱ्या व्यक्तीसाठी हे पाचजण काम करत होते. यांनी पिंपरी-चिंचवड परिसरातील नागरिकांची फसवणूक करून मिळालेले चार कोटींहून अधिक रुपये क्रिप्टोकरन्सी द्वारे हॉंगकॉंग मधील आरोपीला पाठवल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपींनी शेकडो लोकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

जुनेद मुख्तार कुरेशी (वय 21, रा. टिंगरे नगर, पुणे), सलमान मन्सूर शेख (वय 22, रा. इंदिरानगर, लोहगाव रोड, पुणे), अब्दुल अजीज अन्सारी (वय 23, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे), आकिफ अन्वर आरिफ अन्वर खान (वय 29, रा. कोंढवा खुर्द, पुणे), तौफिक गफ्फार शेख (वय 22, रा. इंदिरा नगर, लोहगाव रोड, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. सुसगाव येथील एका महिलेने नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर (एनसीसीआरपी) तिची फसवणूक झाल्याची तक्रार नोंदवली होती. त्याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास पिंपरी-चिंचवड सायबर सेलकडून केला जात होता.

Sangvi : सांगवी परिसरातील मराठी शाळांना संगणक भेट

फिर्यादी महिलेला इंस्टाग्रामवर शेअर मार्केट क्लासेस आणि शेअर मार्केट गुंतवणूक संदर्भात एक जाहिरात दिसली. त्यांना त्यात आवड असल्याने त्यांनी त्यावर क्लिक केले. त्यानंतर दिलेल्या सूचना पाळून पुढे गेल्या असता फिर्यादीला एका व्हाट्स अप ग्रुपला जॉईन करण्यात आले. इन्स्टिट्यूशनल डी मॅट अकाउंट काढण्यासाठी अनोळखी आरोपींनी एक फॉर्म पाठवला. त्यानंतर शेअर मार्केट मध्ये नव्याने येणाऱ्या कंपन्यांचे आयपीओ खरेदी करण्यासाठी फिर्यादीकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यावर 31 लाख 60 हजार रुपये घेतले. फिर्यादी यांनी काही दिवसानंतर गुंतवलेली रक्कम परत मागितली असता ती रक्कम देण्यासाठी आरोपींनी चॅरिटी डोनेशन म्हणून आणखी चार लाख रुपये घेतल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

पैसे मोजण्याच्या मशीनसह लाखो रुपये जप्त

या गुन्ह्याचा तपास करताना फिर्यादी महिलेने ज्या बँक खात्यांवर पैसे पाठवले होते, त्या खात्यांचे सायबर सेलने तांत्रिक विश्लेषण केले. त्यानुसार बँक खाते हाताळणारे आरोपी निष्पन्न करून पोलिसांनी पाच जणांना अटक केली. त्यांच्याकडून सात मोबाईल फोन, रोख रक्कम मोजण्याची मशीन, आठ डेबिट कार्ड, 12 चेकबुक, एक पासबुक आणि सात लाख रुपये रोख रक्कम जप्त केली.

क्रिप्टोद्वारे पैसे हॉंगकॉंगला

अटक केलेल्या पाच जणांकडे तब्बल 120 बँक खात्यांचे तपशील आढळून आले. त्या सर्व खात्यांवर आरोपींनी फसवणुकीच्या वेगवेगळ्या प्रकारणांमधील पैसे घेतले आहेत. बँक खात्यात पैसे आल्यानंतर आरोपी ते पैसे काढून घेत. त्यानंतर ते युएसडीटी या क्रिप्टोकरन्सी मार्फत हॉंगकॉंग या देशात पाठवत असत. आरोपींनी आजवर चार कोटी रुपयांहून अधिक पैसे हॉंगकॉंग येथे त्यांच्या म्होरक्याला क्रिप्टोच्या माध्यमातून पाठवले आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड पोलिसांकडे 75 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत.

हॉंगकॉंगमधून चालतो कारभार

या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्रेग हा हॉंगकॉंग येथे वास्तव्यास आहे. तिथून तो हे फसवणुकीचे नेटवर्क चालवतो. हॉंगकॉंग मधून सोशल मीडियासाठी जाहिराती आणि लिंक तयार केल्या जातात. त्या जाहिराती पाहून कोणी संपर्क केल्यास त्या नागरिकांना लगेच फोन येण्यास सुरुवात होते. शेअर मार्केट मधील गुंतवणूक सुरक्षित आणि फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. त्याद्वारे व्यक्तीकडून गुंतवणुकीच्या बहाण्याने लाखो रुपये घेतले जातात. हे पैसे स्थानिक बँक खात्यांवर घेतले जातात. स्थानिक पातळीवर जुनेद प्रमाणे काही कार्यकर्ते कार्यरत असतात. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचे बँक खात्याचे तपशील घेतलेले असतात. त्यावर फसवणुकीची रक्कम घेतली जाते आणि रक्कम खात्यावर येताच ती तात्काळ काढून घेतली जाते. त्यानंतर तिचे क्रिप्टो मध्ये रूपांतर करून हॉंगकॉंगला पाठवले जाते. याचे स्थानिक कार्यकर्त्यांना ठराविक कमिशन मिळते. मात्र ही फसवणूक असल्याचे माहिती असूनही ही मंडळी हा कारभार करत असल्याचे निष्पन्न झाल्याने सायबर सेलने पाच जणांना अटक केली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे, सहायक आयुक्त (गुन्हे) विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील, सहायक पोलीस निरीक्षक प्रवीण स्वामी, पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण, पोलीस अंमलदार नितेश बिचेवार, अतुल लोखंडे, श्रीकांत कबुले, कृष्णा गवळी, रजनीश तारू, सौरभ घाटे, आशा सानप, ईश्वरी आंभरे यांनी (Chinchwad) केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.