Pimpri: आयुक्तांच्या व्यस्ततेमुळे स्थायी सभेचा वार बदलला; यापुढे दर मंगळवारी स्थायीची सभा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादीची सत्ता असताना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीची साप्ताहिक सभा दर मंगळवारी होत होती. परंतु, प्रथमच पालिकेत सत्तेत आलेल्या भाजपने सभेचा वार बदलून बुधवार केला होता. परंतु, आता सत्ताधा-यांनी बुधवारी काम व्यवस्थित होत नाही. तसेच आयुक्तांना देखील वेळ नसल्याचे सांगत यापुढे स्थायी समितीची सभा मंगळवारी घेण्याचा ठराव आज (बुधवारी) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला.

पालिकेमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर दर मंगळवारी होणारी स्थायीची साप्ताहिक सभा बुधवारी घेण्याची प्रथा सुरू करण्यात आली होती. मात्र, बुधवारच्या दिवशी व्यवस्थित कामकाज होत नसल्याचे समितीच्या लक्षात आले आहे. त्यामुळे या पुढे समितीची सभा पूर्वीप्रमाणे दर मंगळवारी दुपारी दोनला घेण्यात येणार आहे. समितीने पूर्वीच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेले निर्णय बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यामध्ये आणखी एका निर्णयाचा समावेश झाला आहे. या निर्णयामुळे इतर विषय समितीच्या सभाचे नियोजन बदलावे लागणार आहे.

आयुक्त श्रावण हर्डीगर गेल्या आणि बुधवारी स्थायी समितीच्या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. आयुक्तांनी देखील बुधवारच्या ऐवजी दुस-या वारी सभा घेण्यात यावी, असे सांगितले. त्यामुळे यापुढे स्थायी समितीची सभा बुधवार ऐवजी मंगळवारी दुपारी दोन वाजता घेण्यात येणार असल्याचे, स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.