Pimpri: पिंपरीतील काही बड्या नेत्यांनी घेतलाय #Me_too चा धसका!

'रसिक' नेत्यांचा महिला कार्यकर्त्यांबाबत अचानक सावध पावित्रा!

एमपीसी न्यूज – महिलांवरील अत्याचारांबाबत गौप्यस्फोट करणाऱ्या #Me too या मालिकेने देशभर खळबळ उडवून दिलेली असतानाच पिंपरी-चिंचवडमधील काही बड्या नेत्यांनी देखील #Me_too चा चांगलाच धसका घेतल्याचे पहायला मिळत आहे. आपले राजकीय भवितव्य सुरक्षित राहण्यासाठी या ‘रसिक’ नेतेमंडळींनी अचानक बचावात्मक सावध पावित्रा घेतल्याचे पहायला मिळत आहे.

#Me_too या मालिकेत नामवंत अभिनेते, दिग्दर्शक यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांवर आरोप झाल्याने देशभर तो चांगलाच चर्चेचा विषय झाला आहे. जाणते-अजाणतेपणाने महिलांशी गैरवर्तन केलेल्या मान्यवरांची धाबी या आरोप मालिकेमुळे चांगलीच दणाणली आहेत.

पिंपरी-चिंचवडमधील काही नेते त्यांच्या रंगेलपणामुळे सातत्याने चर्चेत राहिले आहेत. त्यांच्या अनेक किश्श्यांची वेळोवेळी शहरात कुजबूज ऐकायला मिळालेली आहे. त्यापैकी कोणाचेही नाव #Me_too मुळे पुन्हा चर्चेत आले तर आश्चर्य वाटू नये, अशी परिस्थिती आहे. #Me_too मुळे महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधील धाडस वाढू लागल्याचे पहायला मिळत असून नेत्यांच्या गैरवर्तनाचा अनुभव दबक्या आवाजात सांगणाऱ्या महिला आता जाहीरपणे आपले अनुभव शेअर करण्याच्या मानसिकतेत असल्याचे पहायला मिळत आहे.

या पार्श्वभूमीवर रसिकतेसाठी प्रसिद्ध असलेल्या काही नेते मंडळींनी त्यांची गुप्तहेर यंत्रणा कामाला लावून आपल्यावर बॉम्ब पडणार नाही ना, याचा सुगावा घेण्याचे काम सुरू आहे. आरोप करण्याचे धाडस दाखवू शकतील, अशा ‘बोल्ड’ महिलांबरोबर ‘पॅचअप’ करण्याचा सावध पावित्रा त्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

या एकूणच वातावरणामुळे राजकीय नेत्यांकडून महिलांना मिळणाऱ्या वागणुकीत चांगलाच फरक पडल्याचे पहायला मिळत आहे. आपल्या रसिकतेला मुरड घालून ही नेतेमंडळी महिलांपासून चार हात लांब राहणेच पसंत करू लागली आहेत. या चांगल्या बदलाबद्दल अनेक महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ‘एमपीसी न्यूज’शी बोलताना समाधानाची भावना व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.