Chinchwad News : पिंपरी चिंचवड पोलीस भरतीतील 686 उमेदवारांची यादी जाहीर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड पोलीस दलात 720 पोलीस शिपाई पदांसाठी भरती घेण्यात आली. या परीक्षेत काही परीक्षार्थींनी गैरप्रकार केला. यामुळे त्यांचे निकाल राखून ठेवत उर्वरित 686 उमेदवारांची निवड यादी पिंपरी चिंचवड पोलिसांकडून जाहीर करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या 720 पदाची लेखी परीक्षा, कागदपत्र पडताळणी, शारिरीक चाचणी व मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे. प्रचलित शासन निर्णय परिपत्रक व महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) 2011 व (सुधारणा) नियम 2019 नुसार पोलीस भरती निवड समितीने 720 पदापैकी 686 उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर केली आहे. तसेच एकूण 363 पदापैकी 355 उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षायादी तयार करण्यात आली आहे.

ही प्रतिक्षायादी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या www.pcpc.gov.in आणि महाराष्ट्र पोलिसांच्या www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस भरती दरम्यान काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले. त्याबाबत निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यामुळे 720 तात्पुरत्या निवड यादीमधील 34 उमेदवारांचा व 363 प्रतिक्षायादी मधील 8 उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. ज्या उमेदवारांचा निकाल राखून ठेवण्यात आलेला आहे अशा उमेदवारांना निकाल राखून ठेवल्या बाबत ईमेल आयडी द्वारे कळविण्यात आले असल्याचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी सांगितले.

भविष्यामध्ये उमेदवारांनी पोलीस भरती प्रक्रियेमध्ये गैरप्रकार केला होता असे निष्पन्न झाल्यास निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची निवड रद्द करण्याचा अंतिम निर्णय पोलीस भरती समितीने राखून ठेवलेला आहे. समान गुण असलेले उमेदवारांची निवड गृह विभाग शासन निर्णयाप्रमाणे करण्यात आली असल्याचे पोलीस उपायुक्त काकासाहेब डोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.