Pimpri Chinchwad RTO News : वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या 1 हजार 200 वाहनांवर कारवाई

एमपीसी न्यूज – वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. फेब्रुवारी 2022 या एका महिन्यात तब्बल 1200 पेक्षा अधिक वाहनांवर आरटीओने कारवाई केली आहे.
इंटरसेप्टर वाहनांमध्ये स्पीडगन बसवण्यात आल्या असून त्याआधारे उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड येथील वायुवेग पथकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जाते. पुणे-नाशिक आणि पुणे-मुंबई महामार्गांवर फेब्रुवारी 2022 या महिन्यात एक हजार 239 चारचाकी वाहनांवर वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याबाबत कारवाई करण्यात आली.

महामार्गांवार वेगमर्यादेचे उल्लंघन झाल्याने अपघातांचे आणि अपघाती मृत्युंचे प्रमाण वाढते. त्यामुळे रस्ता सुरक्षा तसेच अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीकोनातून आरटीओच्या वायूवेग पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. सप्टेंबर 2021 पासून फेब्रुवारी 2022 पर्यंत एकूण 1 हजार 998 चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये सुमारे 1 लाख 89 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक उत्तम राठोड, तानाजी धुमाळ, भालचंद्र कुलकर्णी व सोनाली पोद्दार यांनी केली आहे. सुरक्षित प्रवासाच्या दृष्टीने वाहनधारकांनी वेगमर्यादेचे पालन करावे, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.