Pimpri Crime News : पिंपरी भाजी मंडईत स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेचा छापा; चौघांवर गुन्हा, एकाला अटक

एमपीसी न्यूज – स्पा सेंटर मध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांनी छापा मारला. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली असून चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 14) दुपारी पिंपरी मंडई येथे करण्यात आली.

अक्षय शरद भालेराव (वय 23, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस नाईक जमीद तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे.

याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1956 चे कलम 3, 4, 5 प्रमाणे तसेच भारतीय दंड विधान कलम 370 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अक्षय याला पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.