Pimpri : निवडणुकीसाठी गावगुंडही सज्ज !

एमपीसी न्यूज- साम-दाम-दंड-भेद हे कोणत्याही स्तरावरील निवडणुकांचे अतूट समीकरण आहे. यातील साम आणि दाम हे प्रत्येक उमेदवार आणि कार्यकर्ता आपापल्या परीने करत असून मनी पॉवरशी निगडीत असतो. मात्र दंड आणि भेदसाठी मसल्स पॉवरला पर्याय नाही. यामुळे निवडणुकीत खिशाचे वजन वाढवण्यासाठी गावगुंडांचे स्वतःचे गुन्हेगारी वजन वाढवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरु असल्याचे चित्र आहे. आपली दहशत व नाव निर्माण करण्यासाठी छोटे मोठे गुंडही तोडफोड आणि राडा घालत नावारूपाला येण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे गुंडांची मोर्चेबांधणी मोडून काढण्याचे आव्हान आयुक्तालयापुढे उभे आहे.

नुकतेच पिंपरी येथे एक नगरसेवक व त्याच्या मुलांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र यामध्ये निवडणुकीत काम न केल्याने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे निवडणूक पूर्व, दरम्यान आणि पश्च्यात या तिन्ही वेळेस कायदा सुव्यवस्तेसाठी पोलिसांना तयार रहावे लागणार आहे. शहरात तडीपारीची कारवाई होत असली तरी हे तडीपार उजळ माथ्याने परिसरात वावरत असल्याचेही तितकेच खरे आहे. त्यांच्या दहशतीमुळे त्यांच्याबद्दल माहिती देण्यास कोणीही धजावत नाही. तसेच शहरात अनेक टोळ्यांसोबत नवोदित गुंड सक्रिय आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या मिटिंग सुरु झाल्या असून पाठिंबा कोणत्या पक्षाला द्यायचा याबाबत आर्थिक चर्चा सुरु आहे.

राजकीय गुन्हेगारीचे काय ?
पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये तब्बल २६ नगरसेवक रोकोर्डवरचे गुन्हेगार आहेत. यामध्ये भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे आदी दिग्गज पक्षांचा समावेश आहे. तसेच अनेक महिला नगरसेवकाच्या पतींवरही गुन्हा दाखल आहे. पक्ष आणि व्यक्ती महत्वाचा नाही तर कायदा मोठा आहे असे विधान पोलीस आयुक्त आर.के.पद्मनाभन यांनी केले होते. यामुळे जर व्हाईट कॉलर गुन्हेगार कायदा सुव्यवस्थेला मारक ठरणार असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार का हे असा प्रश्न निर्माण होत आहे.

नवोदित गुन्हेगारांचे पारडे जड
आयुक्तालयाच्या हद्दीत शेकडो विधिसंघर्षित बालक या वर्षी सज्ञान झाले आहेत. तसेच पूर्वीचा रेकॉर्ड नसल्याने या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाईची बंधने येतात. तसेच अल्पवयीन गुन्हेगारही शहरात मोठ्या प्रमाणात सक्रिय असून त्यांच्यावर कारवाई करत असताना खाकीचे हात बांधले जातात. यामुळे अशा गुन्हेगारांचा निवडणुकीत उपयोग करून घेण्यावर भर असल्याचे पाहायला मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.