Pimpri : विराज जगताप खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या – दीपक निकाळजे

Pimpri: Deepak Nikalje demanded the death penalty for accused in Viraj Jagtap murder case पक्षाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

एमपीसी न्यूज – विराज जगताप खून प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आंबेडकर) राष्ट्रीय अध्यक्ष दीपक निकाळजे यांनी केली आहे.

पिंपळे गुरव येथे विराज जगताप या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली होती. विराज जगतापच्या कुटुंबीयांची दीपक निकाळजे यांनी शनिवारी (दि.13) भेट घेऊन सांत्वन केले.

यावेळी माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष अमित मेश्राम, रिपाईच्या कामगार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब पवार, पुणे जिल्हाध्यक्ष अमित वर्मा यांच्यासह विविध पदाधिकारी व रिपाईच्या कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगताप कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर निकाळजे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विराजचा खून करणार्‍या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. ते म्हणाले, विराज जगतापच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून जोपर्यंत यातील आरोपींना फाशीची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी या आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी राज्य शासनाने हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी आमची मागणी आहे.

रिपाइंच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन केले जाणार आहे. कार्यकर्त्यांनी कायदा सुव्यवस्था पाळून आपल्या भावना राज्यकर्त्यांपर्यंत तसेच प्रशासनासमोर मांडाव्यात. प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांना व त्या -त्या ठिकाणच्या पोलीस अधिकार्‍यांना निवेदने देणार आहेत. दलित संरक्षणासाठी रिपाईच्या माध्यमातून लढा उभारला जाईल तसेच जगताप कुटुंबीयांच्या पाठीशी सर्व प्रकारची ताकद रिपाइंच्या माध्यमातून उभी केली जाईल, असेही निकाळजे यावेळी म्हणाले.

विराजच्या कुटुंबीयांना न्याय देण्यास उशीर करू नये तसेच राज्यकर्ते आणि पोलिसांनी दलितांवर होणारे अन्याय रोखावेत अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशाराही निकाळजे यांनी यावेळी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.