Pimpri: ‘माफ झालेल्या एक हजार स्क्वेअर फुटापर्यंतच्या शास्तीची रक्कम परत करा’

एमपीसी न्यूज – राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार स्क्वेअर फुटापर्यंच्या अवैध बांधकामांचा पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकर माफ केला आहे. ज्या नागरिकांनी अवैध बांधकामाचा शास्तीकर भरला आहे. त्यांना तो परत करावा किंवा महापालिकेच्या घरपट्टीमध्ये वळती करुन घेण्याची मागणी निगडीतील नागरिक शांताराम बो-हाडे यांनी केली आहे.

महापालिकेच्या नोंदीनुसार शहरामध्ये एकूण 5 लाख 14 हजार 190 मिळकती आहेत. त्यामधील 4 लाख 36 हजार 285 निवासी मिळकती आहेत. महापालिका क्षेत्रात 4 जानेवारी 2008 नंतर झालेल्या अनधिकृत बांधकामांना शास्तीकर लागू करण्यात आला होता.

राज्य सरकारने सुरवातीला शास्ती करामध्ये 600 चौरस फुटापर्यंतच्या निवासी बांधकामांना माफी दिली होती. तर, 601 ते 1 हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांसाठी शास्ती करात 50 टक्के सवलत दिलेली होती. दरम्यान, 4 मार्च 2019 ला शासनाने काढलेल्या आदेशानुसार एक हजार चौरस फुटापर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने शास्तीकरात माफी दिली आहे. याचा फायदा सुमारे 56 हजार 703 मिळकतींना झाला आहे.

राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील एक हजार स्क्वेअर फुटापर्यंच्या अवैध बांधकामांचा पुर्वलक्षी प्रभावाने शास्तीकर माफ केल्याने नागरिकांची दंडाची रक्कम परत करावी. ज्या नागरिकांनी अवैध बांधकामाचा शास्तीकर प्रामाणिकपणे भरला आहे. त्यांना तो परत करावा किंवा महापालिकेच्या घरपट्टीमध्ये वळती करुन घेण्याची मागणी बो-हाडे यांनी केली होती.

त्यानुसार 8 मार्च 2019 पूर्वी ज्यांनी शास्तीकराची रक्कम भरलेली आहे. त्यांना शास्तीकरात सुट मिळाली आहे. या मिळकरतधारकांची शास्तीकराची रक्कम पुढील आर्थिक वर्षांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे. संगणकीय प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल केल्यानंतर नागरिकांनी भरलेली रक्कम समायोजित (वळती) केली जाणार आहे, असे करसंकलन विभागाने बो-हाडे यांना पत्राद्वारे कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.