Pimpri: ‘माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी ‘लेव्ही’ची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करा’

महाराष्ट्र मजदूर संघटनेचे अध्यक्ष इरफान सय्यद यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – अंगमेहनतीचे काम करणा-या या कामगाराला माथाडी व श्रमजिवी कामगार कायद्याप्रमाणे “काम तेवढेच दाम ” म्हणजेच रोजकष्ट केले तरच पैसे मिळत असतात. म्हणून, कामावर अवलंबून असणारे हे कामगार आपला उदरनिर्वाह २१ दिवस कसा करणार? असा सवाल महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष तथा कामगार नेते इरफान सय्यद यांनी उपस्थित केला आहे. त्यावर उपाय सुचवत माथाडी कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी ‘लेव्ही’ची रक्कम कामगारांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

इरफान सय्यद यांनी महाराष्ट्र मजदूर संघटनेच्या वतीने ट्विटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कामगार राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडू व सचिव, महाराष्ट्र माथाडी-मापाडी-हमाल श्रमजिवी व असंरक्षीत कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदीत कामगारांच्या जमा लेव्हीच्या रकमेतून दहा हजार रुपये इतकी रक्कम कामगारांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या खात्यात जमा करण्याचे संबधित माथाडी मंडळास आदेश देण्यात यावेत, अशी मागणी केली आहे.

इरफान सय्यद यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने कंपनीमध्ये काम करणा-या कामगारांना लाॅकडाऊनच्या काळात किमान वेतन देण्याचे आदेश सर्व कंपनीमालक यांना दिले आहे. पिंपरी चिंचवड, पुणे माथाडी मंडळाच्या अंतर्गत भोसरी, चाकण, तळेगाव, रांजणगाव, यासारख्या औदयोगिक वसाहती येतात व या औदयोगिक वसाहतीतील कंपन्यात २५००० हजार माथाडी कामगार काम करीत आहे. कंपनी बंद असल्याने हा माथाडी कामगार घरी आहे. लाॅकडाऊन च्या काळात आपला उदरनिर्वाह कसा करायचा ह्या चिंतेत हा कामगार आहे.

महाराष्ट्र मजदूर संघटना ही पुणे जिल्ह्यात नोंदीत माथाडी कामगारांचे प्रश्न उपस्थित करून ते सोडवण्यासाठी कार्यरत असलेली संघटना आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड माथाडी मंडळात नोंदीत कामगारांच्या जमा होणा-या पगारातील काही रक्कम ही लेव्हीच्या स्वरूपात माथाडी मंडळाकडे जमा असते. दिवाळी बोनसच्या स्वरूपात ही रक्कम माथाडी कामगार यांना देण्यात येते. आज देशात व राज्यात अनागोंदी परिस्थिती निर्माण झाली आहे. लाॅकडाऊनचे आदेश सरकारने दिले आहे. कंपनीत काम करणा-या कामगाराला जसे किमान वेतन देण्याचे आदेश राज्य सरकारने काढले, त्याच धर्तीवर महाराष्ट्र माथाडी, मापाडी, हमाल श्रमजिवी व असंरक्षीत कामगार कल्याणकारी मंडळ नोंदीत कामगारांच्या जमा लेव्हीच्या रक्केमतुन दहा हजार रुपये इतकी रक्कम कामगारांच्या उदरनिर्वाह करीता त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश संबधित माथाडी मंडळ यांना देण्यात यावेत.

महाराष्ट्र माथाडी, मापाडी, हमाल श्रमजिवी व असंरक्षीत कामगार कल्याणकारी मंडळ हे नेहमीच आपल्या माथाडी कामगारांना विविध योजनांच्या माध्यमातून सहकार्य करीत आले आहे. या कठीण काळातही माथाडी मंडळाने या आपल्या कामगारांना सहकार्य करावे, अशी मागणी सय्यद यांनी राज्य शासनाकडे केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.