Pimpri: विद्यार्थ्यांनो! सुट्टी असली तरी बागांमध्ये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, अन्यथा कारवाई!

विभागीय आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज – कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड व पुण्यामधील शाळांना सुट्या दिल्या आहेत. या काळात विद्यार्थ्यांनी घरी रहावे.  शहरामध्ये, बागांमध्ये, गर्दींच्या ठिकाणी अनावश्यक जाणे टाळावे. या सूचनांचे उल्लंघन करताना आढळल्यास विद्यार्थ्यांवर कारवाई करण्याचा इशारा पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना तशा सूचना दिल्या आहेत. दरम्यान, परीक्षेला जाणा-या विद्यार्थ्यांना हा आदेश लागू राहणार नाही.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे तीन ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. तर, 41 संशयितांच्या द्रावाचे नमुने पुण्यातील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेकडे (एनआयव्ही) तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव होवू नये यासाठी राज्य सरकारने शहरातील शाळांना आजपासून सुट्या जाहीर केल्या आहेत. पुढील आदेश येईपर्यंत सुट्या असणार आहेत. शाळांना दिलेल्या सुट्या या विद्यार्थ्यांनी घरी रहावे यासाठी दिलेल्या आहेत. अनावश्यक शहरामध्ये फिरणे, बागांमध्ये किंवा गर्दींच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जावू नये.

याबाबत विद्यार्थी, पालकांनी कल्पना द्यावी. मुख्याध्यापकांमार्फत शाळेतील सर्व पालकांना याची स्पष्ट जाणीव करुन द्यावी.  मोठ्या समूहामध्ये कोणी सूचनांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्याबाबत कार्यवाही केली जाऊ शकते. त्याची त्यांना पूर्व कल्पना द्यावी. सरकारचे पुढील आदेश येईपर्यंत शाळा बंद राहणार आहेत, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शाळा आणि महाविद्यालयांना कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी सुट्ट्या जाहीर झाल्या आहेत. सर्व पालकांना सूचित करण्यात येत आहे की, मुलांना सार्वजनिक ठिकाणी बागा, उद्याने अशा ठिकाणी नेल्यास गर्दी होऊन पुनःश्च प्रसाराचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे पालकांनी गर्दीच्या ठिकाणी, सार्वजनिक स्थळी गर्दी होऊन कोरोनाचा प्रसार होऊ शकतो, अशा जागी मुलांना घेऊन जाऊ नये अथवा पाठवू नये. आपापल्या पाल्याना हात धुण्याचे महत्त्व समजावून सांगावे. चेहेऱ्याला डोळ्यांना, नाकाला अथवा तोंडाला वारंवार स्पर्श न करण्यास सांगावे. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. खोकताना अथवा शिंकताना नाकासमोर रुमाल धरावा. कोणालाही सर्दी खोकला अथवा ताप अशी लक्षणे दिसल्यास डॉक्टरचा सल्ला घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.