Pimpri : महापालिका मुख्यालयातील व्यायामशाळा स्थलांतरित करु नका – दत्ता साने 

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून कार्यान्वयीत करण्यात आलेली व्यायामशाळा इतरत्र स्थलांतरित करु नये , अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे .

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य इमारतीच्या तळमजल्यावर कर्मचा-यांच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून महापालिका स्थापनेपासून व्यायामशाळा कार्यान्वयीत करण्यात आलेली आहे. मुख्यालयातील या व्यायामशाळेमध्ये मनपाचे बहुसंख्य कर्मचारी सकाळी लवकर व संध्याकाळी कार्यालयीन वेळेनंतर व्यायाम, योगासने इत्यादी व्यायाम प्रकार करत असतात. त्यामुळे कर्मचा-यांच्या शारिरीक स्वास्थ्याबरोबरच त्यांच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीमध्ये या व्यायामशाळेमध्ये अत्याधुनिक सोई सुविधा पुरविणे गरजेचे आहे. परंतु, सदर व्यायामशाळेचे स्थलांतर प्रस्तावित असल्याचे समजते.

महापालिकेचा संपूर्ण डेटा डिजीटल स्टोअर करण्याकरीता निविदा काढण्यात आलेली आहे. या निविदाचे काम सदर व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन ती जागा संबंधित ठेकेदारास देण्याचे नियोजन असून हा ठेका भाजपाच्या एका नगरसदस्याच्या एका निकटवर्तीने घेतल्याचे समजते. त्यामुळे ही व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन कर्मचा-यांची गैरसोय होणार आहे. हा प्रकार गंभीर असून केवळ भाजप नगरसदस्याच्या निकटवर्तीय ठेकेदाराची सोय म्हणून ही व्यायाम शाळा स्थलांतरीत करुन मनपा  कर्मचा-यांवर अन्याय करु नये.

कर्मचा-यांच्या दृष्टीने महत्वाची असणारी व्यायाम शाळा इतरत्र स्थलांतरीत करण्यात येऊ नये. त्याउलट महापालिकेच्या इतर व्यायाम शाळेसारखे या व्यायाम शाळेमध्ये अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात यावीत, अशी मागणी साने यांनी केली आहे. याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.