Pimpri: तीन दिवसांत 5 रुग्ण ‘कोरोना’मुक्त तर, आज आणखी एका महिलेला ‘डिस्चार्च’; आजपर्यंत 18 रुग्ण ‘कोरोना’मुक्त

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असले तरी दुसरीकडे रुग्ण उपचार घेऊन ‘कोरोना’मुक्त देखील होत आहेत. मागील तीन दिवसांत पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलीगी मर्कझमधील धार्मिक कार्यक्रमांतून आलेल्यांच्या हाय रिस्क कॉन्टॅक्टमधील एक महिला कोरोनामुक्त झाली आहे. या महिलेला आज (सोमवारी) डिस्चार्च देण्यात आला आहे.

हाय रिस्क कॉन्टॅक्टमधून या महिलेला कोरोनाची लागण झाली होती. या महिलेवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार करण्यात आले. 14 दिवसांच्या उपचारानंतर महिलेचे नमुने तपासणीसाठी एनआयव्हीकडे पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचे 14 दिवसांचे आणि त्यानंतरच्या 24 तासातील दोनही रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे त्या कोरोनामुक्त झाल्या असून त्यांना आज घरी सोडण्यात आले आहे.

तर, दिल्लीतील तबलीगी जमातीच्या कार्यक्रमातून आलेल्या आणि कोरोनामुक्त झालेल्या एकाला शुक्रवारी, शनिवारी दोघांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, रविवारी देखील कोरोनामुक्त झालेल्या दोन रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आज आणखी एका महिलेला घरी सोडण्यात आले असून मागील तीन दिवसांत पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, 10 मार्चपासून पिंपरी-चिंचवड शहरातील 62 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 18 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधित सक्रिय 43 रुग्ण शहरात आहेत. त्यातील 38 रुग्णांवर महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, सहा सक्रिय कोरोना बाधित रुग्णांवर पुण्यातील आणि एका रुग्णावर परभणी येथील रुग्णालयात अशा सात जणांवर शहराबाहेर उपचार सुरु आहेत. रविवारी (दि.9) एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.