Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरात ‘पुणे मेट्रो’चे उदघाटन; संचालक ब्रिजेश दीक्षित यांची प्रमुख उपस्थिती

एमपीसी न्यूज – नागपूर येथून पुण्यामध्ये दाखल झालेल्या ‘पुणे मेट्रो’च्या पहिल्या ट्रेनचे उद्घाटन महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते झाले. पिंपरी स्वारगेट या मार्गावरील संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे हा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी मेट्रोचे विधिवत पूजन करून उद्घाटन करण्यात आले.

पुणे मेट्रोचे पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन्ही मार्गांवरील काम प्रगतीपथावर आहे. जून 2017 मध्ये महा मेट्रोच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मेट्रो मार्गिकेचे खांब उभारणे, रूळ अंथरणे, विद्युत तारा, सिग्नल आणि अन्य तांत्रिक कामे वेगाने झाली. तीस महिन्यांच्या विक्रमी कालावधीत बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यानंतर, मेट्रोसाठी नागपूर येथून कोच आणण्यात आले आहेत. मेट्रोचा एक संच नागपूरहुन रविवारी (दि. 22) पुण्याकडे रवाना झाला. आठ दिवसांच्या प्रवासानंतर हा संच रविवारी (दि. 29) पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाला.

सोमवारी (दि. 30) मेट्रोचे तिन्ही कोच क्रेनच्या सहाय्याने रुळावर बसवण्यात आले. त्यानंतर, पुणे मेट्रो ट्रायलसाठी सज्ज झाली. आज, मंगळवारी (दि. 31) पुणे मेट्रोची पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील संत तुकारामनगर मेट्रो स्थानक येथे ट्रायल घेण्यात आली.

नारंगी, निळा आणि जांभळ्या रंगांचे प्रतीकात्मक पट्टे या मेट्रोवर आहेत. सशक्त, उत्साह, आनंद आणि कल्पकतेसाठी नारंगी, विश्वास, एकनिष्ठा, बुद्धीचातुर्य आणि आत्मविश्वासाचे प्रतीक म्हणून निळा तर ध्येयसक्त वृत्ती, ताकद आणि समृद्धीची जोड देणारा जांभळा रंग वापरला आहे.

मेट्रोमध्ये महिलांसाठी एक स्वतंत्र कोच आहे. त्यावर गुलाबी रंगाचे पट्टे मारण्यात आले आहेत. त्यावर सर्वधर्मीय सर्व वयोगटातील महिलांच्या प्रतिकात्मक चित्रांचा देखील वापर करण्यात आला आहे. शनिवारवाडा, महात्मा फुले मंडई, आयटी पार्क, संगीत कलेचा वारसा सांगणारे तबला आणि तंबोरा अशी चित्रे देखील लावण्यात आली आहे. या सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची सिहांसनावर बसलेली प्रतिमा देखील लावण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका ते स्वारगेट या मार्गावरील संत तुकारामनगर ते फुगेवाडी या मार्गावर सुरुवातीला मेट्रो धावणार आहे. संत तुकारामनगर, कासारवाडी, फुगेवाडी या स्थानकांदरम्यान ही मेट्रो धावेल. पुढील तीन महिन्यात मेट्रोची आरडीएसओ, सीएमआरएस, रेल्वे बोर्ड या तीन संस्थांकडून तपासणी होणार आहे. त्यानंतर या संस्था मेट्रो सुरु करण्याबाबत त्यांचे प्रमाणपत्र देतील. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.

  • ‘पुणे मेट्रो’ची सुविधा आणि वैशिष्ट्ये –
    # प्रत्येक मेट्रो ट्रेनमध्ये तीन कोच
    # एक कोच कायमस्वरूपी महिलांसाठी राखीव
    # एका मेट्रो ट्रेनमधून 950 ते 970 प्रवासी प्रवास करणार
    # संपूर्ण मेट्रो ट्रेन वातानुकूलित
    # तिन्ही कोच एकमेकांना आतून जोडलेले, त्यामुळे कोणत्याही डब्यात जाणे सहज शक्य
    # स्टेनलेस स्टीलपासून बनवलेले डबे वजनाला हलके
    # अत्याधुनिक एलईडी दीवे, बाह्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार आतील दीवे आपोआप कमी अधिक तीव्र होण्याची यंत्रणा
    # मेट्रो अधिकतम 90 किलोमीटर प्रति तास एवढ्या वेगाने धावणार
    # प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मेट्रो ट्रेनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा
    # मेट्रोमध्ये मोबाईल, लॅपटॉप चार्जिंग सुविधा
    # दृक-श्राव्य सूचनाप्रणालीद्वारे सूचना मिळण्याची सोय

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.