Pimpri : कविवर्य नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन संपन्न

एमपीसी न्यूज – “कवितेला सत्याचा धर्म असतो. ती जातपात (Pimpri) विरहित असते. कष्टकऱ्यांच्या सर्जनाचे मूल्य कधीही कमी होत नाही, हे अधोरेखित करणाऱ्या नारायण सुर्वे यांच्या कवितेला संपूर्ण महाराष्ट्रात सांस्कृतिक घर लाभले आहे!” असे विचार ज्येष्ठ समीक्षक प्रा. श्रीपाल सबनीस यांनी गंगानगर येथे सोमवार 1 मे रोजी व्यक्त केले.

नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित पद्मश्री नारायण सुर्वे काव्यजागर संमेलनाचे उद्घाटन करताना प्रा . श्रीपाल सबनीस बोलत होते. कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य संभाजी मलघे, महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाचे प्रदीप पाटील, सुर्वे यांच्या कन्या कल्पना घारे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

PMPML : पीएमपीएमएलची पर्यटन बससेवा आता फक्त 500 रूपयांत

याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्रा डॉ. जगदीश कदम यांना (पद्मश्री नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान), कविवर्य अरुण म्हात्रे (कवी केशवसुत स्नेहबंध पुरस्कार), रजनी उद्धव कानडे (मास्तरांची सावली कृष्णाबाई सुर्वे सन्मान), अभिजित पाटील (‘आयसीयूच्या काचेतून’) आणि नंदकुमार मुरडे (‘दस्तऐवज शब्दांचा’) यांना अनुक्रमे (नारायण सुर्वे काव्यप्रतिभा आणि शब्दप्रतिभा पुरस्कार) प्रदान करून गौरविण्यात आले.

त्याचबरोबर (Pimpri) नागनाथ पाटील (‘सावली हरवलेलं झाड’), मनीषा पाटील (‘नाती वांझ होताना’), कैलास दौंड (‘आगंतुकाची स्वगते’), खेमराज भोयर (‘सालं अतीच झालं’), अस्मिता चांदणे (‘काट्यातून उडती पंख’), प्रवीण पवार (‘भुई आणि बाई’) यांच्या साहित्यकृतींना (नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार) देऊन सन्मानित करण्यात आले.

सत्काराला उत्तर देताना जगदीश कदम यांनी “बापाच्या नावाने हा पुरस्कार मिळाला आहे असे मी मानतो!” या शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. प्रदीप गांधलीकर आणि मानसी चिटणीस यांनी मुलाखतींच्या माध्यमातून अरुण म्हात्रे तसेच रजनी कानडे यांच्या भावना जाणून घेतल्या.

‘नारायण सुर्वे यांचे वारसदार’ कवी म्हणून सन्मानित करण्यात आलेल्या श्रीनिवास मस्के (नांदेड), वसंत पाटील (सांगली), आत्माराम हारे (पिंपरी), प्रभाकर वाघोले (तळेगाव) तसेच प्रा. अनिल काळबांडे, उद्धव कानडे, ललिता सबनीस आणि सर्व पुरस्कारार्थींनी वैविध्यपूर्ण कवितांचे सादरीकरण करून काव्यजागर केला. काशिनाथ नखाते यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “कामगार हाच क्रांतीचा वाहक असून साहित्यिकांनी वेळोवेळी कामगार चळवळींना पाठबळ दिले आहे!” असे मत व्यक्त केले.

सुदाम भोरे यांनी प्रास्ताविक केले. पुरुषोत्तम सदाफुले, गणेश घारे, सुरेश कंक, राजेंद्र वाघ, जयवंत भोसले, अरुण गराडे, धनंजय सोलंकर, एकनाथ उगले यांनी संयोजनात परिश्रम घेतले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.